ओझरमध्ये भररस्त्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले; दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
ओझर (प्रतिनिधी) :-येथील पंडित कॉलनी भागात भरसंध्याकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी माधवी संजय शेलार (वय ४९, रा. शेलार मळा, ओझर) या शनिवारी (दि. २) सायंकाळी ७:२० वाजेच्या सुमारास पंडित कॉलनीतील आकाश पारख यांच्या घरासमोरून जात होत्या.यावेळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील दोन अज्ञात इसमांनी संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट असलेले मंगळसूत्र (पोत) हिसकावून नेले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.चोरटे दुचाकीवरून पसार झाले.या घटनेबाबत माधवी शेलार यांनी ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सैंदाणे करत आहेत.ओझर परिसरात चैन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याने नागरिक, विशेषतः महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी,अशी मागणी होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा