नाशिक: जिंदाल कंपनीत दीड लाखांच्या कॉपर वायरची चोरी; राजस्थानी ट्रेलर चालक रंगेहात गजाआड

(ईगतपुरी प्रतिनिधी)
नाशिक ग्रामीण मधील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतून तब्बल दीड लाख रुपये किमतीची तांब्याची (कॉपर) तार चोरणाऱ्या एका राजस्थानी ट्रेलर चालकाला सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले आहे. घोटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

(विशेष प्रतिनिधी)

नाशिक :- नाशिक ग्रामीणमधील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव शिवारात असलेल्या नामांकित 'जिंदाल पॉलीफिल्म' कंपनीत चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीतून १ लाख ५० हजार रुपये किमतीची कॉपरची तार चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चालकाला सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

'तांत्रिक अडचण' असल्याचे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भागु उदा कीर (वय ५४, रा. गोबिंदपुरा,जि.भीलवाडा,राज्य-राजस्थान) हा ट्रेलर चालक म्हणून काम करतो. तो त्याचा ट्रेलर (क्रं. RJ.06.GB.7168) घेऊन जिंदाल कंपनीत सामान शिफ्टिंग करण्यासाठी आला होता.काम संपल्यानंतर, त्याने गाडीत काहीतरी 'तांत्रिक अडचण' आली असल्याचे नाटक केले आणि तो गाडी घेऊन कंपनीच्या बाहेर पडू लागला.

सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे चोरी उघड

ट्रेलर कंपनीच्या मुख्य गेटवर आला असता, तेथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना संशय आला. सुरक्षा रक्षकांनी गाडी थांबवून केबिनची कसून तपासणी केली. या तपासणीत केबिनमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसलेली, अंदाजे १०० किलो वजनाची आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीची कॉपरची (तांब्याची) तार लपवून ठेवलेली आढळली.

घोटी पोलिसांत गुन्हा दाखल

कंपनीचे कर्मचारी संतोष कुमार लालमोहन मिश्रा (वय ४७) यांनी याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या