अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्याच्या कामकाजाचा न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांनी घेतला आढावा



जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान
नाशिक,दि.१४ :- कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे (प्रशासन), उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे (दिंडोरी),कैलास कडलग (चांदवड),जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव राकेश पाटील आदी उपस्थित होते, तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह उपविभागीय अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 
 

न्या. शिंदे (निवृत्त) यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधत जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या प्रक्रियेची गती वाढवावी. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून घ्यावी, असे सांगत न्या. शिंदे (निवृत्त) यांनी प्राप्त अर्जांची सद्य:स्थिती व निकाली काढलेले अर्ज, प्रलंबित अर्जांची कारणे व त्यावरील उपाययोजना, प्रमाणित मोडी लिपिचे भाषांतरकार यांचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात १ कोटी दहा लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत १ लाख १८ हजार ५८५ अर्जांपैकी १ लाख १६ हजार ५५८ नवीन जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली. तसेच ६ मे २०२६ पर्यंत ३० हजार ७९९ जात वैधता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. याबद्दल न्या. शिंदे (निवृत्त) यांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या