येवला (प्रतिनिधी):- तालुक्यातील नायगव्हाण शिवारात अज्ञात चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेती साहित्याकडे वळवला असून, एका शेतकऱ्याच्या विहिरीवरून अंदाजे २० हजार रुपये किमतीची सोलर पंप मोटार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सूर्यभान काळवणे (वय ४२, रा. नायगव्हाण) यांचे नायगव्हाण शिवारात गट नंबर १६७ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीवर त्यांनी 'रायडेन एंटरप्रायजेस लिमिटेड' कंपनीची ५ एचपी (HP) क्षमतेची सोलर पंप मोटार बसवली होती. १६ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समोर आले.अज्ञात चोरट्याने विहिरीतून ही महागडी मोटार लंपास केली आहे.या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सिंचनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या घटनेबाबत सुनील काळवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खैरनार (बक्कल नंबर २६९३) करत आहेत.परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0 टिप्पण्या