मोसम पुलावर पोलिसांनी रचला सापळा आणि उघड झाले ११ गाड्यांच्या चोरीचे मोठे रॅकेट


मालेगाव हादरले! चोरीच्या ११ मोटारसायकलसह दोन गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगाव :-  शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या असून,दोन जणांना ताब्यात घेतले आहे.जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालेगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.'मोसम पुल' परिसरातील बस स्टॉपजवळ एक संशयित विना नंबरची गाडी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला.पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.त्याच्याकडे असलेल्या 'हिरो एच.एफ. डिलक्स' गाडीबद्दल विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र,पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार शहजाद अहमद शकिल अहमद उर्फ शहजाद गुजी याच्यासह ही गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
पाप्या चोरवा पोलिसांच्या जाळ्यात:
अधिक तपासात असे समोर आले की, या चोऱ्या केलेल्या गाड्या विक्री करण्यासाठी शोएब अन्सारी फय्याज अहमद उर्फ पाप्या चोरवा (वय ३१, रा. जाफरनगर) याच्याकडे देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 'पाप्या चोरवा' याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून खालील गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
०३ हिरो एच.एफ. डिलक्स.०३ होंडा युनिकॉर्न.०२ होंडा शाईन.०१ होंडा ॲक्टिव्हा.०१ यामाहा एफ.झेड.०१ हिरो सी.डी. डॉन

दोन गुन्हे उघड, मुख्य आरोपी फरार:
या कारवाईमुळे मालेगाव छावणी आणि पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.सध्या 'पाप्या चोरवा' याला मालेगाव छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, मुख्य आरोपीत शहजाद गुजी,हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे.
ज्या नागरिकांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत, त्यांनी आपल्या कागदपत्रांसह मालेगाव छावणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि आपल्या गाड्यांची ओळख पटवून घ्यावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, जुनी गाडी खरेदी करताना कागदपत्रांची पूर्ण शहानिशा करावी आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या