नाशिक :- नाशिक जवळील महादेवपूर शिवार परिसरात घडलेल्या एका धक्कादायक आणि क्रूर हत्याकांड प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.प्रेमसंबंधा आड येणाऱ्या फिर्यादीच्या पतीची लोखंडी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने आजन्म कारावासाची (उम्रकैद) आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.काय आहे संपूर्ण घटना? ही थरारक घटना १८ मे २०२२ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास नाशिक तालुक्यातील महादेवपूर शिवारातील मोंढे फार्म रोडवरील धुपकर यांच्या फ्लॅटमध्ये घडली होती.आरोपी संदीप पोपट गोतरणे, (रा. गोवर्धन, नाशिक) याचे फिर्यादी महिला 'कुसुम' (नाव बदललेले) हिच्यासोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांची माहिती महिलेच्या पतीला झाली होती.घटनेच्या दिवशी मयत पती आणि त्यांची पत्नी खोलीत गप्पा मारत असताना,आरोपी संदीप गोतरणे हा हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन तिथे घुसला."तू कुसुमला माझ्याशी बोलायला आणि भेटायला का नाही म्हणतोस? तू आमच्या रस्त्यात येतोस,तुला संपवूनच टाकतो,"असे ओरडत आरोपीने मयताच्या डोक्यावर, मानेवर,पाठीवर आणि गालावर कोयत्याने एकापाठोपाठ एक सपासप वार केले.या जीवघेण्या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला होता.न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा,नाशिक तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ३०२, २०१ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-९ दळवी यांच्या न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली.न्यायालयाने आरोपी संदीप गोतरणे याला दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली.कलम ३०२ खून आजन्म कारावास आणि ५,००० रुपये दंड.कलम २०१ (पुरावा नष्ट करणे): ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड.कलम ५०६ (धमकावणे): ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड.विशेष म्हणजे,आरोपीला ठोठावण्यात आलेल्या एकूण १५,००० रुपयांच्या दंडाची रक्कम या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.पोलीस आणि सरकारी वकिलांची कामगिरी यशस्वी या गुन्ह्याचा सखोल तपास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव आणि त्यांच्या पथकाने केला.त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात भक्कम आणि ठोस पुरावे सादर केले.हा गुन्हा न्यायालयात शाबीत करण्यासाठी सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) सचिन गोरवाडकर, पैरवी अधिकारी सपोउनि मधुकर पवार,गुन्हे दोषसिद्धी विभागाचे सपोनि श्रीकांत पाटील,महिला पोलीस अंमलदार भांगे आणि अश्विनी परदेशी,यांनी मोलाची भूमिका बजावली.त्यांनी फिर्यादी,महत्त्वाचे साक्षीदार आणि पंच यांना वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन करून गुन्हेगाराला जेलच्या गजाआड धाडण्यात यश मिळवले.
0 टिप्पण्या