चांदवड :- मनमाड-मालेगाव रोडवरील दहेगाव शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अजय संजय गांगुर्डे (वय २५, रा. मनोली,ता.वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर; सध्या रा. दहेगाव, ता. चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहेगाव शिवारातील सई मल्हार हॉटेलजवळ घडली. अजय गांगुर्डे हे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना भीषण धडक दिली. या अपघातात अजय यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, नंतर हिरे मेडिकल कॉलेज आणि अखेर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २९ एप्रिल रोजी पहाटे अजय यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मयत अजय यांच्या पत्नी दिपाली अजय गांगुर्डे (वय २३) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार स्वप्निल साहेबराव रंधे करित आहे.
0 टिप्पण्या