दिवाळीनंतर वाढतोय श्वसनाचा त्रास; फटाक्यांच्या धुराचा फुफ्फुसांवर गंभीर परिणाम – डॉ. स्वप्निल काकड,अशोका मेडिकव्हर

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- दिवाळीचा सण उत्साहात साजरा झाल्यानंतर वातावरणात फटाक्यांचा धूर, धूलिकण आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम मानवी श्वसनसंस्थेवर, विशेषतः फुफ्फुसांवर होताना दिसतो.दिवाळीनंतर अनेक नागरिकांना खोकला,सर्दी,घशात खवखव,श्वास घेण्यास त्रास,छातीत जडपणा तसेच दम लागणे अशा तक्रारी जाणवू शकतात.

फटाक्यांमधून निर्माण होणारे सूक्ष्म प्रदूषित कण (PM 2.5 आणि PM 10) श्वसनमार्गातून फुफ्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज व जळजळ निर्माण होऊन श्वसनासंबंधी त्रास वाढू शकतो. विशेषतः दमा - अस्थमा,सीओपीडी (COPD), अॅलर्जी तसेच आधीपासून फुफ्फुसांचे आजार असलेल्या रुग्णांना याचा अधिक धोका असतो.याबाबत मार्गदर्शन करताना डॉ.स्वप्निल काकड, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक यांनी सांगितले की, दिवाळीनंतर वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम काही दिवस जाणवू शकतो. लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,गर्भवती महिला आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.सतत खोकला येणे, छाती मध्ये घरघर होणे,श्वास लागणे किंवा छातीत दुखणे,ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :

- प्रदूषणाचे प्रमाण अधिक असताना शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
- बाहेर जाताना योग्य प्रकारचा मास्क वापरावा.
- घरामध्ये धूळ व धूर येणार नाही याची काळजी घ्यावी.
- पुरेसे पाणी प्यावे आणि धूम्रपानापासून दूर राहावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इनहेलर- (दम्याचा पंप )किंवा इतर औषधे बंद करू नयेत.
- श्वास घेण्यास तीव्र त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
- ⁠ताप किंवा सर्दी खोकल्या सारखी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये 

दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.फटाक्यांच्या धुराचा परिणाम केवळ वातावरणावरच नव्हे, तर आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

– डॉ. स्वप्निल काकड 
(श्वसन विकार तज्ज्ञ, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या