कळवणमध्ये भव्य जॉगिंग ट्रॅक साकारणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मोठा निर्णय

कळवणमध्ये साकारणार हक्काचा जॉगिंग ट्रॅक;पोलीस,सैन्य भरतीच्या तयारीला मिळणार बळ! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून सुधारित प्रशासकीय मान्यता
तरुणांसाठी सुरक्षित धावपट्टीसह नागरिकांनाही आरोग्यदायी सुविधा
नाशिक :- पोलीस, सैन्य तसेच अन्य गणवेशधारी सेवांमध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कळवण तालुक्यातील तरुणांसाठी दिलासादायक निर्णय झाला आहे.कळवण नगरपंचायत हद्दीतील जॉगिंग ट्रॅकच्या कामाला नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे शहरातील तरुणांना धावण्याच्या सरावासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प मार्गी लागत आहे.

शासनाच्या निधीतून विकासकामांना चालना

नगरविकास विभागाच्या १२ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये दिंडोरी नगरपंचायतीसाठी ३ कोटी रुपये,तर कळवण नगरपंचायतीसाठी ७ कोटी रुपये,असा एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेनुसार प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार असून, कामांची अंमलबजावणी संबंधित नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. कळवणच्या मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावास २० सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

जुन्या कामाऐवजी सुधारित कामांना मान्यता

नगरविकास विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शुद्धिपत्रकानुसार कळवण नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक ७ मधील जलशुद्धीकरण केंद्राजवळ संरक्षण भिंत बांधण्याचे ३०० लाख रुपयांचे प्रस्तावित काम रद्द करण्यात आले. त्याऐवजी सुधारित विकासकामे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. संबंधित जुन्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला नव्हता तसेच त्यासाठी मंजूर निधी उपलब्ध होता.त्यानुसार मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ई-ऑफिस प्रणालीद्वारे सुधारित प्रस्ताव सादर केला.अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी या कामांना तांत्रिक मान्यता दिली असून, नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी यासंदर्भात ठरावही मंजूर केला आहे.

भरतीपूर्व मैदानी सरावासाठी मिळणार हक्काचे मैदान

कळवण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनेक युवक पोलीस,सैन्यदल तसेच अन्य सुरक्षा दलांमध्ये भरती होण्यासाठी मेहनत घेत आहेत.पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीला विशेष महत्त्व असून पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे,१०० मीटर धावणे व गोळाफेक,तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे,१०० मीटर धावणे व गोळाफेक या प्रकारांचा समावेश आहे.मैदानी चाचणीतील कामगिरी आणि वेळेवर आधारित गुण अंतिम निवडीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यासाठी नियमित सराव,योग्य अंतराचे मोजमाप आणि सुरक्षित धावपट्टी आवश्यक असते.सध्या स्वतंत्र धावपट्टी उपलब्ध नसल्यामुळे अनेक उमेदवारांना रस्त्यांवर सराव करावा लागतो. जॉगिंग ट्रॅक कार्यान्वित झाल्यानंतर उमेदवारांना निश्चित अंतरावर वेळेचे नियोजन करून सराव करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होण्यास आणि भरतीच्या तयारीला शिस्तबद्ध दिशा मिळण्यास मदत होईल.

सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी आरोग्यदायी सुविधा

जॉगिंग ट्रॅकचा लाभ केवळ भरतीची तयारी करणाऱ्या युवकांपुरता मर्यादित राहणार नाही. सकाळी व सायंकाळी चालणे,धावणे आणि व्यायाम करणे पसंत करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.शहरात सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील तांत्रिक व निविदा प्रक्रियेला गती मिळणार असून, कळवण शहरातील युवकांच्या क्रीडा व भरतीपूर्व तयारीसाठी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा निर्माण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या