नाशिक/मालेगाव :- नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः मालेगाव शहर व लगतच्या तालुक्यांमध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक,डाॅ डि एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने समांतर तपास करत असताना एकूण २९ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरांचे धाबे दणाणले असून तब्बल ०९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
📍 राजानगर परिसरात रचला सापळा, २ संशयित ताब्यात
मालेगाव शहरातील नाउघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. मालेगाव शहरातील राजनगर अदिब रोड परिसरात काही संशयित चोरीच्या मोटारसायकल कमी किमतीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच,पोलिसांनी तातडीने सापळा रचून खालील दोन संशयितांना ताब्यात घेतले:
१) युसुफ अली अहमद अली (रा. जाफरनगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक)
२) अदिल शहजाद अब्दुल रौफ (रा. राजानगर, अदीबरोड, मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक)
👥 मुख्य सं.आरोपीत 'सराईत गुन्हेगार', तिसरा साथीदार फरार!
ताब्यात घेतलेला संशयित आरोपीत युसुफ अली अहमद अली हा सराईत गुन्हेगार असून, त्याचेवर यापूर्वीही मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुली दिली की,त्याने आणि त्याचा साथीदार पापा (पूर्ण नाव माहीत नाही, रा. जाफरनगर, मालेगाव - सध्या फरार) या दोघांनी मिळून टिंगरी, नांदगाव, मेहुणबारे, पवारवाडी, चांदवड, नाशिक शहर,धुळे आणि मालेगाव शहरातून विविध ठिकाणांवरून मोटारसायकल चोरी केल्या होत्या.
हे सं.आरोपीत चोरी केलेल्या मोटारसायकल त्यांचा मित्र अदिल शहजाद अब्दुल रौफ याच्या माध्यमातून मालेगाव शहरात पैसे घेऊन गहाण ठेवत किंवा विक्री करत असत. सध्या पोलीस फरार आरोपी 'पापा' याचा कसोशीने शोध घेत असून,आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
🏍️ जप्त केलेल्या २९ दुचाकींची यादी (एकूण किंमत १५ लाख १० हजार रुपये):
पोलिसांनी सं.आरोपींच्या ताब्यातून १५,१०,०००/- रुपये किमतीच्या खालील २9 दुचाकी जप्त केल्या आहेत:
• होण्डा युनिकॉर्न: ०६
• सुझुकी अॅक्सेस: ०५
• होण्डा शाईन: ०३
• बर्गमन स्कूट्री: ०३
• हिरो एच.एफ. डिलक्स: ०२
• हिरो सी.डी.डिलक्स: ०२
• यामाहा एफझी: ०१
• होण्डा डॅझलर: ०१
• पॅशन प्रो: ०१
• स्पॅलेंडर प्लस: ०१
• होण्डा सी.बी.हॉर्नेट: ०१
• बजाज डिस्कव्हर: ०१
• बुलेट: ०१
• हिरो सी.डी. डॉन: ०१
📁 या ९ पोलीस ठाण्यांमधील गुन्हे झाले उघड:
१) मालेगाव तालुका पो.स्टे. (गुरंनं १००१/२०२६)
२) नांदगाव पो.स्टे. (गुरंनं ३६४/२०२६)
३) पवारवाडी पो.स्टे. (गुरंनं १३७/२०२४)
४) चांदवड पो.स्टे. (गुरंनं २३०/२०२६)
५) मेहुणबारे पो.स्टे. चाळीसगाव (गुरंनं २८५/२०२६)
६) आडगाव पो.स्टे. नाशिक शहर (गुरंनं ३८९/२०२६)
७) धुळे शहर पो.स्टे. (गुरंनं ३८७/२०२६)
८) आडगाव पो.स्टे. नाशिक शहर (गुरंनं ३७७/२०२६)
९) सरकारवाडा पो.स्टे. नाशिक शहर (गुरंनं २५६/२०२६)
📢 नागरीकांना पोलिसांचे जाहीर आवाहन!
जप्त करण्यात आलेल्या सर्व चोरीच्या मोटारसायकल सध्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेल्या आहेत.
१) वाहनधारकांसाठी: मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत, त्यांनी आपल्या दुचाकीची मूळ कागदपत्रे घेऊन मालेगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि आपल्या वाहनाची खात्री करून घ्यावी.
२) जुनी गाडी खरेदी करताना काळजी घ्या: नागरिकांनी यापुढे कोणतीही जुनी मोटारसायकल खरेदी करताना तिच्या मूळ कागदपत्रांची (R.C. Book इ.)कसून पडताळणी करावी.
३) पोलिसांना माहिती द्या:जर कोणी संशयीत व्यक्ती बाजारापेक्षा खूप कमी किमतीत,विना नंबरप्लेटची किंवा बनावट नंबर प्लेट लावलेली मोटारसायकल विक्री करण्यासाठी आल्यास,नागरिकांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या