गाळणे येथील नवादे वस्तीवरील अंगणवाडीत मंत्री दादाजी भुसे यांची भेट; बालकांना नवीन कपडे, भेटवस्तू आणि खाऊचे वाटप
नाशिक :- एका बाजूला दुष्काळाच्या झळा, पाण्याची चिंता आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणारे ग्रामीण जनजीवन… अशा वातावरणात सणांचा आनंदही अनेकदा परिस्थितीच्या मर्यादेत अडकून पडतो.मात्र,परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये,त्यांच्या बालविश्वात आनंदाचे रंग भरले जावेत,या भावनेतून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील गाळणे गावच्या नवादे वस्तीवरील अंगणवाडी केंद्राला भेट दिली.या भेटीतून त्यांनी केवळ बालकांची विचारपूस केली नाही,तर त्यांच्या आनंदात सहभागी होत मायेचा दिवाळीचा दिवाही उजळविला.दिवाळी सारख्या सणासुदीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि विशेषतः बालकांच्या निरागस बालपणावर परिस्थितीच्या सावल्या पडू नयेत,ही संवेदनशील भावना या भेटीतून अधोरेखित झाली.मंत्री भुसे अंगणवाडीत पोहोचताच चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.कुणाच्या चेहऱ्यावर कुतूहल, कुणाच्या डोळ्यांत उत्सुकता,तर कुणाच्या ओठांवर स्वागताचे गोड शब्द… अशा निरागस वातावरणात अंगणवाडीचा परिसर आनंदाने फुलून गेला.
बालकांनी विविध कविता सादर करून मंत्री दादाजी भुसे यांच्यासह उपस्थितांची मने जिंकली.त्यांच्या चिमुकल्या आवाजातील कवितांनी जणू दुष्काळाच्या गंभीर वातावरणात आनंदाची एक प्रसन्न लकेर उमटविली.मंत्री दादाजी भुसे यांनीही बालकांमध्ये रमून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.त्यांच्या कविता ऐकल्या, बालसुलभ प्रश्नांना प्रतिसाद दिला आणि त्यांच्या निरागस अभिव्यक्तीचे कौतुक केले. यावेळी बालकांना नवीन कपडे,भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. भेटवस्तू हातात पडताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद,डोळ्यांतील चमक आणि ओठांवरील हसू या क्षणाला अधिकच अविस्मरणीय करून गेले.बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न मनाला स्पर्शून जाणारा ठरला. कारण संकट कितीही मोठे असले तरी बालपणाचा आनंद हिरावला जाऊ नये, हीच समाजाच्या संवेदनशीलतेची खरी कसोटी असते. सणाचा खरा अर्थ केवळ घराघरांत दिवे लावण्यात नसून, दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे,याची जाणीव या भेटीने करून दिली.महिला आणि बालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी,अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कुटुंबांच्या पाठीशी आपुलकीने उभे राहण्याचा आणि बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा हा जिव्हाळ्याचा उपक्रम ठरला.परिस्थितीच्या उन्हातही बालपण कोमेजू नये,त्यांच्या निरागस हास्याला काळजीची किनार लाभू नये आणि प्रत्येक चिमुकल्याच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले जावेत,हाच या भेटीमागील संवेदनशील भाव होता,असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.दुष्काळाच्या सावटात शासनाच्या मायेचा हात देत उजळविलेला हा आनंदाचा दीप चिमुकल्यांच्या मनात निश्चितच सुखद आठवण बनून राहणारा ठरणार आहे.
0 टिप्पण्या