नाशिक :-‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती,त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरी नदी व इतर जलाशयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिककरांनी मातीच्या गणेश मुर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन “देव द्या, देवपण घ्या !” या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी केले आहे.सुविचार मंच या सामाजिक संस्थेंच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून“देव द्या, देवपण घ्या !”हा उपक्रम राबविण्यात येतो.यंदाचे या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे.‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’हे अनेक महिने पाण्यात विरघळत नाही.त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गाळ नदी,तलाव,विहिरी व अन्य जलाशयाच्या तळाशी साचला जातो.त्यामुळे पाण्याचे जिवंत झरे बंद होण्याचा धोका असतो.प्लॅस्टर ऑफ परिसच्या मुर्तीवरील रासायनिक रंग,सौंदर्य प्रसाधने यांमुळे मासे व इतर जलचरांना धोका निर्माण होतो तसेच पाण्याच्या गुणवत्तेला देखील हानी पोहचते.त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवात गणपतीच्या पुजेसाठी व पर्यावरणासाठी उपयुक्त अशा मातीच्या मुर्तींना नाशिककरांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन‘देव द्या,देवपण घ्या !’या उपक्रमाचे संयोजक आकाश पगार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात केले आहे.गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन‘सुविचार मंच’च्या कार्यकर्त्यांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करू नये अशी जनजागृती करणारी पत्रके वाटली जातात.नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत.गेली १५ वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड,पाच व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात येतात.दरवर्षी नाशिककरांकडून संकलित केलेल्या गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात.दरवर्षाप्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क“देव द्या,देवपण घ्या”उपक्रमात कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आकाश पगार यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या