जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा मूक मोर्चा२५ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची मागणी;मुंबईत बेमुदत आंदोलनाचा इशारा


नाशिक :- दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या आणि त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने शनिवारी (दि. ५) शिक्षक दिनी राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.राज्यातील सुमारे २६ हजार पेन्शनपीडित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत २५ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट शासन आदेश काढावा,अशी मागणी संघटनेने केली आहे.
शासनाकडून निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल.त्यानंतर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.दरम्यान,आगामी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक,कर्मचारी, पदवीधर विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका संघटनेने निवेदनातून जाहीर केली आहे. जुन्या पेन्शन योजनेचा हक्क असल्याचा दावा करीत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी मुकमोर्चात योगेश पाटील, संजय देसले,दिगंबर नारायने, सचिन पगार,मोहन चकोर,प्रदीप सांगळे, दत्तात्रय सांगळे,जिभाऊ शिंदे,राजेंद्र देवरे,संपत कदम,शेख साजिद,सुनील खैरनार,महाजन यु आर,सचिन शिरसाठ,योगेश कांगणे, गोसावी सर,शेख अनशारी,जिल्हा भरातील हजारो पेन्शन पीडित बांधव सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या