मविप्र विधी महाविद्यालयात कै. अॅड. बाबुराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहास प्रारंभ



उद्घाटनानंतर अॅड. मिलिंद थोबाडे यांचे फौजदारी कायद्याच्या न्यायशास्त्रावर मार्गदर्शन
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालय,नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. अॅड.बाबुराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहाचा शुभारंभ आज उत्साहात झाला. समाज दिनानिमित्त १९ ते २५ ऑगस्टदरम्यान आयोजित या सप्ताहात विधी विद्यार्थ्यांना फौजदारी कायदा,न्यायालयीन प्रक्रिया आणि खटल्याच्या विविध टप्प्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.सप्ताहाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (MAT) माजी सदस्य न्या.पुखराज बोरा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. जयंत जयभावे,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य तसेच अॅड. मिलिंद थोबाडे, BCMG चे माजी अध्यक्ष व सदस्य आणि सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे होते.यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे म्हणाले, “सामाजिक चळवळीतून स्थापन झालेली मराठा विद्या प्रसारक संस्था असून,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या तीनही क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्रातच नव्हे,तर भारतातील एकमेव संस्था म्हणून या तिन्ही क्षेत्रांत व्यापक काम करण्याचा संस्थेला अभिमान आहे.”यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. विलासकुमार देशमुख व समन्वयक डॉ.संध्या गडाख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुंडलिक भोसले तसेच विधी अध्यापक मनोज पेखळे सर , जानव्ही झांजे मॅडम,राहुल बल्लाळ सर,गांगुर्डे मॅडम,बाविस्कर मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवर्ग,अॅडव्होकेट आणि मोठ्या संख्येने विधी विद्यार्थी उपस्थित होते.उद्घाटनानंतर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी अॅड.मिलिंद थोबाडे यांनी ‘भारतातील फौजदारी कायद्याचे न्यायशास्त्र’या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी भारतातील फौजदारी कायद्याची संकल्पना,त्यामागील न्यायशास्त्रीय भूमिका,फौजदारी न्यायव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे तसेच कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले.फौजदारी कायद्याचा अभ्यास करताना केवळ कायद्याच्या कलमांचे ज्ञान पुरेसे नसून,त्या कायद्यामागील उद्देश, न्यायशास्त्र आणि त्याचा न्यायालयीन प्रक्रियेशी असलेला संबंध समजून घेणे आवश्यक असल्याचे अॅड.थोबाडे यांनी स्पष्ट केले.विविध उदाहरणे आणि न्यायालयीन अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन CMCS कॉलेज, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस,गंगापूर रोड येथे करण्यात आले असून,२५ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत.या उपक्रमामुळे विधी विद्यार्थ्यांना फौजदारी कायद्याचे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यांची सांगड घालण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या