बाधित परिसरांना प्राधान्य; घराघरात सर्वेक्षण करून डासांच्या उत्पत्तीस्थळांवर तातडीने कारवाई
नाशिक :- शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया,मलेरिया आणि स्वाईन फ्लूच्या संभाव्य वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे.साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रथम बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात विशेष सर्वेक्षण व तपासणी केली जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांमध्येही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रात मलेरिया फील्ड वर्कर आणि आरोग्य सेविकांचे संयुक्त पथक घराघरात जाऊन सर्वेक्षण करणार आहे. प्रत्येक घरातील पाण्याची भांडी, कुलर,फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी,गच्ची,सज्जा, झाडांच्या कुंड्या तसेच डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या इतर ठिकाणांची तपासणी करण्यात येईल.डास अली आढळल्यास तातडीने पाणी रिकामे करणे, अबेटिंग करणे तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.यासोबतच ताप,अंगदुखी किंवा इतर लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांची तातडीने नजीकच्या रुग्णालयात तपासणी करण्यात येईल.यापूर्वी डेंग्यू,चिकुनगुनिया किंवा मलेरियाचे रुग्ण आढळलेल्या घरांच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून,खासगी रुग्णालयांकडून संशयित अथवा बाधित रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित परिसरात ४८ तासांच्या आत आरोग्य पथकांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.महापालिकेने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देणे,आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करणे,कुलर व इतर पाण्याची साठवण असलेल्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे आणि तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.डेंग्यू,मलेरिया व चिकुनगुनिया पासून बचावासाठी लक्षात ठेवा.आठवड्यातून किमान एकदा घरातील पाण्याच्या टाक्या,हौद, बादल्या व इतर भांडी स्वच्छ करून कोरडी करा.कुलर,फ्रिजच्या ट्रे, फुलदाण्या, कुंड्यांखालील ताटल्या आणि छतावरील पाण्याचे साचलेले भाग नियमित रिकामे करा.जुने टायर,प्लास्टिकचे डबे,नारळाच्या करवंट्या,बाटल्या किंवा पाणी साचू शकणाऱ्या वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावा.सर्व पाण्याच्या टाक्या व साठवणुकीची भांडी झाकून ठेवा.पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा तसेच आवश्यक असल्यास डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळीचा वापर करा.ताप,अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना,पुरळ किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे,विशेषतः वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.
सलग पावसाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घ्या.घराच्या आजूबाजूला, गच्चीवर,बेसमेंटमध्ये किंवा बांधकामस्थळी पाणी साचले असल्यास त्वरित काढून टाका.पावसाचे पाणी साचलेल्या खड्डे किंवा नाल्यांच्या परिसरात अनावश्यक वावर टाळा.पावसामुळे घरात ओलावा वाढल्यास परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवा.अशा प्रकारच्या सुचना नाशिक महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना देण्यात येत आहे.
0 टिप्पण्या