नाशिक - "सिंहस्थाची कामे वेळेत आणि दर्जेदारच व्हावीत; मंत्री गिरीश महाजनांचे कडक निर्देश!"

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत व उच्च दर्जाने पूर्ण करा;नागरिकांची गैरसोय टाळून कामांना गती द्या - मंत्री गिरीश महाजन

नाशिक :- सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरू सर्व पायाभूत विकासकामे निर्धारित कालमर्यादेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करावीत.नागरिकांची गैरसोय टाळत सर्व कामांना गती द्यावी, कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये आणि सर्व विभागांनी समन्वयातून कार्य करावे,असे निर्देश जलसंपदा,आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयातील सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते.बैठकीस महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे,आमदार गोकुळ गिते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,
सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,स्मिता झगडे,कुंभमेळा प्राधिकरणाचे उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नगरसेवक सुधाकर बडगुजर,लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक शहरातील रस्ते विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात द्यावे.एका बाजूचे काम पूर्ण होताच तो मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा,उर्वरित कामे समांतरपणे सुरू ठेवावीत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, साईडपट्ट्या पूर्ववत करणे,काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करणे आणि पावसाळ्यातही शक्य त्या ठिकाणी कामे सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.कामांमुळे वाहतूक वळविण्यात आलेल्या मार्गांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांनी पार पाडावी.विशेषतः द्वारका सर्कल,काठे गल्ली,त्र्यंबक रोड, सातपूर आणि इतर पर्यायी मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी.वाहतूक पोलिस, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे वाहतूक व्यवस्थापन करावे,असेही मंत्री गिरीश महाजन यांनी निर्देशित केले.रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा किंवा विलंब कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.कामे वेळेत सुरू न करणाऱ्या अथवा करारातील अटींचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांवर नियामानुसार कारवाई केली जाईल.तसेच नियमित देखभाल ही कंत्राटदारांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.यासह ऑप्टिकल फायबर नेटवर्क,सीसीटीव्ही यंत्रणा,डेटा सेंटर,पाणीपुरवठा, एसटीपी,सिव्हरेज,पूल,डीपी रस्ते, महाडा प्रकल्प तसेच प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यातील सर्व प्रकल्पांना गती द्यावी.मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामे सुरू करावीत.शहरातील कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसाठी डीपीआर सादर करावा.सर्व विभागांनी नियमित समन्वय ठेवून कालबद्ध नियोजनानुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या सर्व विकासकामांचे सादरीकरण केले.त्यांनी रस्ते,पूल, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज,सिव्हरेज,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), ऑप्टिकल फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही,अग्निसुरक्षा,आरोग्य सुविधा तसेच इतर पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली.मंजूर प्रकल्पांसह प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यातील प्रकल्पांचाही त्यांनी आढावा सादर केला.रस्ते प्रकल्पांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की,प्रमुख सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील एका बाजूची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असून,डीएलसीसीची कामे पूर्ण झालेल्या मार्गांवर पुढील टप्प्यात अंतिम काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.गंगापूर फाटा,अंबड,राजीव गांधी मार्ग,त्र्यंबक रोड,सातपूर आदी प्रमुख मार्गांवरील स्टॉर्म वॉटर ड्रेनेज,पाणीपुरवठा,जलनिस्सारण आणि इतर भूमिगत सुविधांची कामे नियोजनानुसार सुरू असून ऑगस्ट अखेरपर्यंत बहुतांश युटिलिटीची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संत गाडगे महाराज पूल,त्र्यंबक रोड परिसरातील पूल तसेच इतर पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. नदीपात्रातील पायाभूत कामे पूर्ण झाली असून उर्वरित संरचनात्मक कामांना गती देण्यात आली आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिव्हेज पंपिंग स्टेशन आणि सिव्हरेज नेटवर्कची कामे समाधानकारक प्रगतीत आहेत.शहरात प्रस्तावित ऑप्टिकल फायबर नेटवर्कपैकी सुमारे २६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम रस्ते प्रकल्पांशी समन्वय साधून सुरू आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून त्याद्वारे वाहतूक नियंत्रण,गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रभावी देखरेख ठेवता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सर्व प्रकल्पांसाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक काम नियमितपणे मॉनिटर करून सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या