धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य होण्याच्या पात्रतेत सुधारणा - राजश्री गुंड

नाशिक :-राज्य शासनाने 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ'या मंडळाचे नामकरण 'धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ'असे करण्यात आले आहे.त्यानुषंगाने सर्व प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक व अनुज्ञप्तीधारक चालकांना मंडळाचे सदस्य करुन घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.सर्व प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक व अनुज्ञप्तीधारक चालकांनी ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून सदस्य व्हावे,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक राजश्री गुंड यांनी केले आहे.मंडळाच्या सदस्यत्वासाठी सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणाऱ्या बॅजधारक अनुज्ञप्तीधारक चालकांना पात्रता देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, कॅब, ॲप-आधारित (ओला, उबर) वाहने,पर्यटन वाहने तसेच इतर सर्व प्रवासी वाहने चालविणारे चालक मंडळाचे सदस्य होऊ शकणार आहेत.सदस्यत्वाबाबतच्या पात्रतेत सुधारणा करण्यात आल्याने अधिकाधिक प्रवासी वाहन चालकांना या मंडळाचा लाभ घेता येणार आहे.मंडळाचे सदस्य झाल्यानंतर पात्र चालकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय,नाशिक येथे संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या