नाशिक :-नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे दरमहा अनुदान ३,००० रुपयांवरून ६,००0 रुपये करण्यात यावे,अशी आग्रही मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त नितीन नेर,यांच्याकडे मागणी निवेदन देण्यात आले.निधी अखर्चित राहत असल्याने दिव्यांगाबांधव नाराजी व्यक्त करत आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराविक निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवला जातो.नाशिक शहरात सद्यस्थितीत सुमारे ४,००० दिव्यांग लाभार्थी आहेत.मात्र,नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्न दरवर्षी वाढत असूनही दिव्यांगांसाठीचा ५% राखीव निधी पूर्णपणे खर्च केला जात नाही.हा निधी इतरत्र वळवला जातो किंवा अखर्चित राहतो.त्यामुळे शहरातील दिव्यांग व्यक्ती त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ३,००0 रुपये अनुदान मिळत आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात हे अनुदान अत्यंत तुटपुंजे असून,दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे अनुदान दरमहा ६,००० रुपये करणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.संघटनेने महासभेत प्रस्ताव ठेवण्याची मागणी
यापूर्वीच २० मे २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, यांच्यात झालेल्या बैठकीत केली होती.या बैठकीत अनुदान वाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन तो मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.त्या पार्श्वभूमीवर,आगामी महासभेत दिव्यांग अनुदान वाढीचा अधिकृत प्रस्ताव ठेवून त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी,अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार,दत्ता कांगणे,लक्ष्मण पवार,दिपक भोई,बबलू मिर्झा, समाधान शिंदे,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या