नाशिक,दि.१७जुलै:-नाशिक परिक्रमामार्ग (रिंग रोड) प्रकल्पांतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या हरकती,सूचना,मागण्या,फेरविचार अर्ज तसेच भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत दि. १६ व १७ जुलै २०२६ रोजी विशेष सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विशेष भूसंपादन अधिकारी यांनी आयोजित केलेल्या या विशेष सुनावणीस बाधित शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन दिवसांत एकूण २६४ अर्ज व हरकती प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी दिली आहे.विशेष सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये वाढीव मोबदला,बागायती दर लागू करणे, संपादित क्षेत्रातील दुरुस्ती,पुर्नमोजणी (संयुक्त मोजणी) करणे तसेच जमिनीच्या मूल्यनिर्धारणा संदर्भातील हरकती यांचा प्रामुख्याने समावेश आहे.१६ जुलै २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत बेळगाव ढगा (१०),राजूर बहुला (३), पिंपळगाव बहुला (१२),सारूळ (१), मखमलाबाद (१५), विहितगाव (१०), मातोरी (७),चांदशी (९),गोवर्धन (४) व मुंगसरे (१२) या गावांतून एकूण ८३ अर्ज/हरकती प्राप्त झाल्या.१७ जुलै २०२६ रोजीच्या सुनावणीत ढकांबे (३),वरवंडी (५),आंबेबहुला (१),गौळाणे (११), पाथर्डी (४८), पिंपळगाव खांब (१०),वडनेर दुमाला (१९),पंचक (१),देवळाली (१२),आडगाव (३१),विंचूरगवळी (१२) व माडसांगवी (२८) येथून एकूण १८१ अर्ज/हरकती प्राप्त झाल्या आहेत.तर महादेवपूर, जलालपूर आणि मानोरी येथून कोणतीही हरकत अथवा अर्ज प्राप्त झाला नाही.विशेष सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची संबंधित विशेष भूसंपादन अधिकारी यांच्यामार्फत नियमानुसार छाननी करण्यात येणार असून,पात्र प्रकरणांमध्ये लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सुनावणी उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हरकती,सूचना व मागण्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहेत.प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या