(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे.अशा परिस्थितीत डेंग्यू,मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढतो.ही बाब लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभागाने नागरिकांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार करणारा एडीस एजिप्टाय हा डास स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतो.केवळ सात दिवस पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्तीहोऊ शकते.त्यामुळे घर, सोसायटी,कार्यालय तसेच बांधकाम परिसरात पाणी साचणार नाही याची प्रत्येकाने नियमित दक्षता घेणे आवश्यक आहे. महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,आयुक्त मनिषा खत्री,आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाविरोधातील लढ्यात महानगरपालिकेसोबत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.महानगरपालिकेमार्फत शहरातील विविध भागांत डास प्रतिबंधक औषध फवारणी,धूर फवारणी, अळीनाशक उपाययोजना तसेच आवश्यकतेनुसार गप्पी मासे सोडण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात डासांची उत्पत्ती आढळल्यास त्वरित महानगरपालिकेशी संपर्क साधून सहकार्य करावे.
डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनियापासून बचावासाठी लक्षात ठेवा.आठवड्यातून किमान एकदा घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, बादल्या व इतर भांडी स्वच्छ करून कोरडी करा.कुलर, फ्रिजच्या ट्रे,फुलदाण्या, कुंड्यांखालील ताटल्या आणि छतावरील पाण्याचे साचलेले भाग नियमित रिकामे करा.जुने टायर,प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या,बाटल्या किंवा पाणी साचू शकणाऱ्या वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावा.सर्व पाण्याच्या टाक्या व साठवणुकीची भांडी झाकून ठेवा.पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा तसेच आवश्यक असल्यास डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळीचा वापर करा.ताप,अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना,पुरळ किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे,विशेषतः वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.
सलग पावसाच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घ्या
घराच्या आजूबाजूला,गच्चीवर, बेसमेंटमध्ये किंवा बांधकामस्थळी पाणी साचले असल्यास त्वरित काढून टाका.
पावसाचे पाणी साचलेल्या खड्डे किंवा नाल्यांच्या परिसरात अनावश्यक वावर टाळा.
पावसामुळे घरात ओलावा वाढल्यास परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवा.
लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना डासांपासून विशेष संरक्षण द्या.
परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याचे आढळल्यास महानगरपालिकेला त्वरित माहिती द्या.सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभाग - विभागनिहाय संपर्क
विभाग
प्रभाग
संपर्क अधिकारी
मोबाईल
नाशिक पूर्व
१४, १५, १६, २३, ३०
महेंद्र कांबळे
९१३००४७६२४
नाशिक पश्चिम
७, १२, १३
राजेश वाघ
९९२१८०३४४७
पंचवटी
१, २, ३, ४, ५, ६
रविंद्र राऊत
९८३४३९२९९३
नवीन नाशिक (सिडको)
२४, २५, २७, २८, २९, ३१
नदिमखान पठाण
९८२२७४७४७०
सातपूर
८, ९, १०, ११, २६
नारायण जाधव
८६६८८७७६०६
नाशिक रोड
१७, १८, १९, २०, २१, २२
अनंता वाघ
९२६०१०१०४८
आयुक्त मनिषा खत्री यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की,"महानगरपालिका डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी सातत्याने सर्व आवश्यक उपाययोजना राबवत आहे.मात्र,या लढ्यात नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विशेषतःसध्या सुरू असलेल्या सलग पावसाच्या काळात घरात किंवा परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि आजाराची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय उपचार घेणे,या साध्या सवयींमुळे डेंग्यू,मलेरिया आणि चिकुनगुनियावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल.प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच नाशिकला डासजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवता येईल.
0 टिप्पण्या