(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :-इगतपुरी जवळील प्रसिद्ध भावली डॅम परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकमधील एका पर्यटकाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या ९ जणांच्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे.या कारवाईमुळे पर्यटन क्षेत्रातील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.यासर्व घटनेबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
१२ जुलै रोजी नाशिक शहरातील एक कुटुंब भावली डॅम परिसरातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते.सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तेथे उपस्थित असलेल्या दोन अनोळखी मुलांनी कुटुंबातील महिलेला पाहून शिट्टी वाजवून छेडछाड केली. या प्रकाराला महिलेच्या पतीने कडाडून विरोध केला.याचाच राग मनात धरून संशयित आरोपींतांनी बेकायदेशीर टोळी जमवली आणि पीडित कुटुंबाला धक्काबुक्की व दमदाटी करण्यास सुरुवात केली.परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हे कुटुंब आपल्या कारने नाशिकच्या दिशेने निघून गेले.चित्रपटाप्रमाणे केला पाठलाग; वाहनांची तोडफोड
कारवाईची भीती न बाळगता संशयितांनी पीडित कुटुंबाच्या कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.त्यांनी कार अडवून बांबूच्या काठ्या,बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेचा विनयभंग केला,पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि साक्षीदाराचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला.
पोलीस यंत्रणा गतिमान, ९ संशयित ताब्यात या धक्कादायक घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये (BNS कलमे) गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी,अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि इगतपुरी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकाने इगतपुरी आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून शोध मोहीम राबवून खालील ९ संशयितांना ताब्यात घेतले:
१) विशाल मच्छींद्र भटाटे (वय २७, रा. गिरणारे)
२) अनिकेत गणेश मानवढे (वय २४, रा. गिरणारे)
३) अनिरुद्ध विठोबा भागडे (वय २७, रा. नांदगाव सदो)
४) सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (वय २२,रा.माणिकखांब)
५) विनोद लक्ष्मण बोराडे (वय २६, रा. इगतपुरी गावठा)
६) सचिन दत्तु आडोळे (वय २९, रा. माणिकखांब)
७) अर्जुन चिंधु आडोळे (वय २५, रा. माणिकखांब)
८) देविदास कचरू भगत (वय २५, रा. बलायदुरी)
९) अजय भूषण दालभगत (वय २०, रा. देवळे घोटी)
टाटा योद्धा पिकअप जप्त,फरार आरोपींचा शोध सुरू पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता,त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले टाटा योद्धा पिकअप वाहन (क्र. MH 15 CL 3734) जप्त केले आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपी आणि वापरलेल्या इतर वाहनांचा शोध नाशिक ग्रामीण पोलीस पथक अत्यंत कसोशीने घेत आहे.
0 टिप्पण्या