बिजलीनगर येथील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; १२ तास वीज गायब मधुकर बच्चे यांची कारवाईची मागणी


चिंचवड :- बिजलीनगर येथील महावितरणच्या एका महत्त्वाच्या ट्रान्सफॉर्मरला रविवारी (दि. ६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,यामुळे चिंचवडगाव, पिंपरीचा काही भाग,गावडे नगर, रावेत,काळेवाडी,चिंचवडे नगर आणि वाल्हेकर वाडी या मोठ्या परिसराचा विद्युत पुरवठा तब्बल १२ तास खंडित झाला होता.या गंभीर दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी केली आहे.या अपघातानंतर महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी तातडीने अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली.या घटनेवरून आता महावितरण आणि महापारेषण आमनेसामने आले आहेत.महावितरणकडून ही महापारेषणची चूक असल्याचे सांगण्यात येत आहे,दुसरीकडे महापारेषण आपली चूक मान्य करण्यास तयार नसल्याचे मधुकर बच्चे म्हणाले.त्यामुळे या संपूर्ण अपघाताला नेमके जबाबदार कोण?संबंधित अधिकारी की कर्मचारी?असा संतप्त सवाल बच्चे यांनी उपस्थित केला आहे.
जनतेला मानसिक व आर्थिक भुर्दंड
सलग १२ तास वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे तसेच घरातच वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वीज नसल्यामुळे हाल झाले.तसेच व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.जनतेच्या या त्रासाला कारणीभूत असणाऱ्या दोषींचा शोध घेणे गरजेचे आहे,असे बच्चे यांनी म्हटले आहे."हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे खरे कारण शोधणे आवश्यक आहे.वरिष्ठ अधिकारी या घटनेला केवळ एक 'नैसर्गिक अपघात' ठरवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कडक शासन झालेच पाहिजे.जर यावर योग्य कारवाई झाली नाही, मुख्यमंत्र्यांकडे याविषयी सविस्तर अहवाल पाठवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी"करण्याचा इशारा मधुकर बच्चे,यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या