नाशिक,दि.१७:- नाशिक शहर स्वच्छ,सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या 'उन्नत नाशिक अभियान'अंतर्गत'हरित कुंभ – हरित मान्सून'अर्थात'मिशन ग्रीन मान्सून'अभियानाचा चौथा टप्पा रविवारी (१९ जुलै)पार पडणार आहे.या टप्प्यात सकाळी ९ वाजता दरी येथील दऱ्याई माता देवस्थान परिसरात,तर सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवणई येथील नाशिक उपकेंद्र परिसरात विद्यापीठाच्या पुढाकारातून देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे.या वृक्ष लागवडीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात हिरव्यागार,स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात होणार असून,शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचे संस्कारही या परिसरातून रुजतील.भविष्यात हजारो विद्यार्थी ज्या परिसरात ज्ञानार्जन करतील,तो परिसर वृक्षांच्या सान्निध्यात नटलेला असावा,हीच या उपक्रमामागील भावना आहे.या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उन्नत नाशिक अभियानाच्या माध्यमातून नाशिकमध्ये पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.विविध सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक संस्था, पर्यावरणप्रेमी,स्वयंसेवी संस्था, युवक संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या अभियानाला लाभत आहे.या अभियानाची सुरुवात २८ जून रोजी सातपूर येथील देवराई परिसर आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर म्हसरूळ वनराई (पिकॉक गार्डन) आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात सुमारे सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.तिसऱ्या टप्प्यात नंदिनी नदीच्या दोन्ही काठांवर सहा हजार देशी वृक्षांची लागवड करून नदीला कायमस्वरूपी हरित संरक्षण कवच देण्याचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून नाशिकच्या डोंगराळ आणि शैक्षणिक परिसराची हरित विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे.दऱ्याई माता देवस्थान परिसरात डोंगराळ भागाचे हरित वैभव वाढविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड केली जाणार असून त्यासाठी दऱ्याई माता देवस्थान यांनी पुढाकार घेतला आहे.या मोहिमेत लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी,विविध सामाजिक संस्था, युवक,विद्यार्थी,पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून,पर्यावरण संवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या