कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांकडून त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी; प्रत्यक्ष स्थळ तपासणी,नोंदी व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश
नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून विशेष भर दिला जात आहे.याच अनुषंगाने कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी आज त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण (टीपीक्यूसी) प्रयोगशाळेला भेट देत विविध चाचणी प्रक्रिया व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान आयुक्त शेखर सिंह, यांनी प्रयोगशाळेतील सुविधा, साहित्य तपासणी प्रक्रिया, काँक्रिट गुणवत्ता चाचण्या,अहवाल प्रणाली तसेच निर्धारित तांत्रिक निकषांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतली.त्यांनी संबंधित अधिकारी व तांत्रिक पथकांशी संवाद साधत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या गुणवत्तेसंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
प्रकल्पस्थळी वेळेत आणि प्रभावीपणे गुणवत्ता तपासणी करता यावी,यासाठी मोबाईल टेस्टिंग लॅबची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नियमित तपासण्यांबरोबरच विविध कामांच्या ठिकाणी अचानक गुणवत्ता तपासणी करून कामांचा दर्जा कायम राखण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मंजूर प्रकल्प आराखड्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या सर्व चाचण्या वेळापत्रकानुसार आणि निर्धारित निकषांप्रमाणे पार पाडण्यात याव्यात. तसेच प्रत्येक चाचणीचे अहवाल,निष्कर्ष,तारीख आणि स्थळ यासह सविस्तर नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात,जेणेकरून देखरेख आणि परीक्षण प्रक्रिया अधिक सक्षम होईल,असे निर्देश आयुक्तांनी दिले.
काँक्रिटच्या गुणवत्तेबाबत करण्यात येणाऱ्या चाचण्या मंजूर डिझाईन मिक्स आणि तांत्रिक मानकांनुसारच करण्यात याव्यात. कंत्राटदार,सल्लागार संस्था आणि देखरेख करणाऱ्या यंत्रणांनी समन्वयाने काम करत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत होणारे पायाभूत सुविधा प्रकल्प हे केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित नसून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी दीर्घकालीन उपयोगाचे ठरणार आहेत. त्यामुळे कामांचा वेग आणि गुणवत्ता या दोन्ही बाबींना समान महत्त्व देणे आवश्यक आहे.सक्षम त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, नियमित स्थळ तपासणी आणि पारदर्शक नोंद प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक काम निर्धारित दर्जानुसार पूर्ण होईल याची दक्षता घेतली जात आहे."
ते पुढे म्हणाले,"गुणवत्ता नियंत्रण ही केवळ अंतिम टप्प्यातील प्रक्रिया नसून काम सुरू झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर राबविण्याची जबाबदारी आहे.संबंधित सर्व यंत्रणांनी संभाव्य त्रुटी वेळेत ओळखून आवश्यक सुधारणा कराव्यात आणि उच्च दर्जाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत."
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नियोजित विविध पायाभूत सुविधा आणि नागरी कामे वेळेत, दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगाची व्हावीत,यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून नियमित आढावा घेण्यात येत आहे.
0 टिप्पण्या