महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या सह जिल्हाधिकारी वरीष्ठ अधिकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव संपन्न


नाशिक :- महानगरपालिकेच्या ८८ प्राथमिक शाळांमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात संपन्न; बैलगाडी,घोडागाडीतून आलेल्या चिमुकल्यांचे औक्षण करून जंगी स्वागत
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व ८८ प्राथमिक शाळांमध्ये'शाळा प्रवेशोत्सव' अत्यंत आनंदी,चैतन्यमय आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडला.शाळांचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी संस्मरणीय ठरावा आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी,या उद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये अभूतपूर्व तयारी करण्यात आली होती.पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या आणि इतर इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण मनपा शिक्षण प्रशासन सज्ज झाले होते.

या शाळा प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने झालेले शाही आगमन हे होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत आणण्यासाठी विविध शाळांमध्ये आकर्षक पारंपरिक व्यवस्था करण्यात आली होती. सजवलेली गाडी, घोडागाडी, पारंपरिक बैलगाड्या व इतर वाहनांमधून चिमुकल्यांना वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात अत्यंत उत्साहात शाळेत आणण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला. शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे कुंकू-तिळा लावून आणि आरती ओवाळून औक्षण करण्यात आले, तसेच त्यांना गुलाबपुष्प देऊन अतिशय आपुलकीने शाळेच्या पहिल्या दिवशी वर्ग खोलीत प्रवेश दिला गेला.

इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या लहान बालकांसाठी यावर्षी 'पहिले पाऊल' हा अत्यंत भावनिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी या चिमुकल्यांच्या पावलांचे रंगांचे ठसे सुंदर कागदावर उमटवून घेण्यात आले. हा उपक्रम पालकांसाठी अत्यंत कौतुकाचा आणि भावूक करणारा ठरला. मुलांच्या या पहिल्या पाऊलखुणा त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची पहिली सुंदर आठवण म्हणून शाळा प्रशासनाकडून जतन केल्या जाणार आहेत. शाळांमधील डिजिटल स्क्रीन, रंगीबेरंगी बोलक्या भिंती, फुग्यांची सजावट आणि आनंदी वातावरण पाहून पहिल्यांदाच शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक वेगळाच आनंद आणि हास्य पाहायला मिळाले.

या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील आणि महानगरपालिकेतील अनेक उच्चपदस्थ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यामध्ये आयुष प्रसाद,जिल्हाधिकारी नाशिक, हेमांगी पाटील,अप्पर जिल्हाधिकारी नाशिक,हिमगौरी आहेर आडके, महापौर नाशिक,विलास शिंदे उपमहापौर नाशिक,मनीषा खत्री,मनपा आयुक्त,अमित रंजन,प्रदीप चौधरी,अतिरिक्त आयुक्त मनपा,चंदकांत गवळी,पोलीस उपायुक्त नाशिक शहर, नाशिक महापालिका नगरसेवक,मनपा उपायुक्त,डॉ.मिता चौधरी प्रशासन अधिकारी,शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,आणि विविध विभागांचे विभागीय अधिकारी आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी विविध शाळांना भेटी दिल्या.या सर्व मान्यवरांनी प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, वह्या,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्या.

विविध शाळांमधील कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये होत असलेल्या गुणात्मक आणि पायाभूत दर्जेदार बदलांचे जाहीर कौतुक केले.डिजिटल शिक्षण आणि आधुनिक सुविधांमुळे मनपा शाळा खाजगी शाळांच्या तोडीस तोड बनत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच उपस्थित सर्व पालक,शिक्षक आणि नागरिकांना मिळून"शिक्षणाच्या दिशेने समृद्ध पाऊल" टाकण्याचे आवाहन केले.पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि शिक्षकांकडून मिळालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह दिसून आला, ज्यामुळे यंदाचा शाळा प्रवेशोत्सव नाशिक शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या