तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे - सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर



नाशिक :- तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून या योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी स्वावलंबी व्हावे,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर,यांनी केले.

श्री.स्वाद बँक्वेट हॉल,पाथर्डी फाटा, नाशिक येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांच्या वतीने तृतीयपंथीय व्यक्तींसाठी आयोजित विशेष शिबिरात ते बोलत होते.यावेळी  कौशल्य विकास विभागाचे अधिकारी सिद्धार्थ पवार, निंबाळकर,ॲड पुष्पा ढवळे, इंगळे,किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक, किंन्नर आखाडा महामंडळाचे पुजा नंदगिरी,आचार्य महामंडळेश्वर शिवशक्ती आखाड्याचे तथा किन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.वैभवी पाटील,आदी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त नांदगावकर म्हणाले की,तृतीयपंथीय व्यक्तींनी समाज कल्याण विभागाच्या बीज भांडवल योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, लघुउद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळवून शासकीय योजनांशी जोडले जावे, असे आवाहन केले.

शिबिरात अँड.ढवळे,यांनी तृतीयपंथीय व्यक्तींचे कायदेशीर हक्क, संरक्षण आणि विविध शासकीय तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक मनोगत व्यक्त केले.समाज कल्याण विभागाच्या बीज भांडवल योजनेची माहिती इंगळे,यांनी दिली. यावेळी इच्छुक तृतीयपंथीय व्यक्तींचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच अर्जांचे वितरणही करण्यात आले. कौशल्य विकास विभागाचे अधिकारी पवार,आणि निंबाळकर, यांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रम,रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

शिबिरस्थळी ई-सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.यामार्फत आधार कार्ड, आभा कार्ड,रेशन कार्ड,मतदार नोंदणी यांसारख्या विविध सेवांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.अनेक लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले तसेच आधार कार्ड व आभा कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.शिबिरादरम्यान तृतीयपंथीय कलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तींचा सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर,व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या