मंत्री गिरीश महाजन महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत आयटीआय सिग्नल ते सातपूर कार्यालय मार्ग वापरासाठी खुला

 त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज त्र्यंबक रोड येथे ‘वारकऱ्यांसोबत त्र्यंबकरोड सज्ज’ या विशेष अभियानाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,महापालिका आयुक्त मनीषा खत्री,गटनेते श्याम बडोदे,पदाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून त्र्यंबकरोडवरील वाहतुकीचा शुभारंभ केला.त्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वाहनातून मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या उपक्रमांतर्गत आयटीआय सिग्नल ते सातपूर कार्यालय (एका बाजूने) हा महत्त्वाचा मार्ग नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. आयटीआय सिग्नल ते सातपूर कार्यालय हा १,१०० मीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे त्र्यंबकरोड, सातपूर औद्योगिक परिसर,पश्चिम नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलसा मिळणार असून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल फायबर केबल (महाआयटी सीसीटीव्हीसह),एमएनजीएल गॅस पाइपलाइन,मलनिस्सारण व्यवस्था आणि पाणीपुरवठा यांसारख्या सर्व उपयुक्तता सेवांची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहेत.

या कार्यक्रमास महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,आणि प्रदीप चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी,वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, निर्धारित वेगमर्यादा पाळावी,काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि विकासकामांना सहकार्य करावे.नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ साठी आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचा नाशिक महानगरपालिकेचा संकल्प निश्चितपणे साकार होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

रस्ता प्रकल्पाची माहिती
घटक
माहिती
रस्त्याचा प्रकार
डांबरी व सिमेंट काँक्रीट (व्हाईट टॉपिंग)
विभाग
सातपूर विभाग
रस्त्याची एकूण लांबी
४,७७० मीटर (४.७७० कि.मी.)
ऑप्टिकल फायबर केबल (महाआयटी सीसीटीव्हीसह)
१०० टक्के पूर्ण
एमएनजीएल गॅस पाइपलाइन
१०० टक्के पूर्ण
मलनिस्सारण व्यवस्था
१०० टक्के पूर्ण
पाणीपुरवठा व्यवस्था
१०० टक्के पूर्ण

"आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.याच पार्श्वभूमीवर वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिक तसेच वारकऱ्यांच्या सुविधेसाठी संबंधित रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे,आगामी सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या दृष्टीने सातपूर विभागातील या रस्त्यावर सर्व उपयुक्तता सेवा शंभर टक्के पूर्ण करून नागरिकांसाठी दर्जेदार आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.अशी प्रतिक्रिया मनीषा खत्री,आयुक्त,नाशिक महापालिका यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या