नाशिक - जलजीवन मिशन अंतर्गत बसवलेले इलेक्ट्रोक्लोरीनेटर यंत्र लंपास;चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल


 

नाशिक :- नाशिक तालुक्यातील विल्होळी येथे शासनाच्या 'जलजीवन मिशन' योजनेला चोरट्यांनी लक्ष केले आहे. गावातील पाणी शुद्धीकरणासाठी बसवण्यात आलेले अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे 'इलेक्ट्रोक्लोरीनेटर' यंत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,विल्होळी गावासाठी जिल्हा परिषद नाशिकच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन योजने अंतर्गत मिठापासून पाणी शुद्ध करणारे इलेक्ट्रोक्लोरीनेटर यंत्र बसवण्यात आले होते.हे यंत्र गावातील एका विहिरीच्या बांधाजवळ असलेल्या सुरक्षित रूममध्ये ठेवण्यात आले होते. ६ एप्रिल २०२६ ते ६ जून २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने या रूममधून यंत्राचा बॉक्स चोरून नेला.
याप्रकरणी विल्होळी ग्रामपंचायतीचे अधिकारी पांडुरंग सोपानराव सोळुंके (वय ४९,रा.आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नाशिक तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारी मालमत्तेची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस हवालदार डी.एन.वाजे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या