नाशिक: मिरची पूड टाकून फायनान्स कर्मचाऱ्याला लुटणारे ३ दरोडेखोर जेरबंद; हरसुल पोलिसांची धडक कारवाई



(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महिला बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला लुटणाऱ्या ३ अट्टल आरोपींना हरसुल पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी स्पोर्ट्स बाईक,रोकड आणि मोबाईलसह एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पारधीपाडा ते लाडची रस्त्यावरील थरार
मिळालेल्या माहितीनुसार,५ जून २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास 'ए यु फायनन्स'कंपनीचा कर्मचारी नवनाथ चंदर मोरे हा महिला बचत गटाचे गोळा केलेले ८४,८८० रुपये आणि सॅमसंग कंपनीचा टॅब बॅगेत घेऊन मोटारसायकलने जात होता. पारधीपाडा ते लाडची गावाच्या दरम्यान असलेल्या निर्जन रस्त्यावर काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी मोरे यांना गाठले.आरोपींनी थेट नवनाथ मोरे, यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना खाली पाडले आणि पैशांची बॅग हिसकावून विळवंडी गावच्या दिशेने पळ काढला.या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदार आणि CCTV च्या मदतीने आरोपींना बेड्या
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.स्थानिक गुन्हे शाखा (LCB),गुप्त बातमीदार,सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.पोलिसांनी सापळा रचून खालील ३ आरोपींना ताब्यात घेतले:
१) योगेश लहानु फसाळे (वय २०, रा. लाडची, नाशिक)
२) जयराम महादु पारधी (वय २९, रा. पारधीपाडा, लाडची, नाशिक)
३) सोपान हरी पारधी (वय २२, रा. पारधीपाडा, लाडची, नाशिक)
३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
८४,८८० रुपये रोख रक्कम (विविध नोटा)
४,००० रुपये किमतीचा सॅमसंग टॅबलेट
फिर्यादीची कागदपत्रे असलेली बॅग
२,१५,००० रुपये किमतीची यमाहा आर.वन.फाईव्ह (R15) मोटारसायकल (MH 15 KX 7265)
सं.आरोपींताचे ६०,००० रुपये किमतीचे ३ मोबाईल (मोटोरोला आणि विवो कंपनीचे)
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
ही यशस्वी कामगिरी हरसुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर,आणि त्यांच्या पथकाने केली आहे.या कारवाईनंतर नाशिक ग्रामीण पोलीस दलाने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की,गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आपल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावावेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या