विकसित असं भारत रोजगार योजनेंतर्गत प्रोत्साहन निधीचे झाले वितरण

नाशिक दि.१९ :- केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यानिमित्त सातपूर,नाशिक येथील निमा हाऊस कार्यालयात दुपारी प्रादेशिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार सीमाताई हिरे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी  आयुक्त अतुल कोटकर,उद्योजक ॲड.यश राठी,निमाचे अध्यक्ष आशिष नहार,आयमा चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे,कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सह संचालक चंद्रशेखर पाटील,सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिल बाबरेकर,लाभार्थी उपशिक्षक विशाल सोनवणे,यांच्यासह उद्योजक,नव उद्योजक व कर्मचारी उपस्थित होते.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,यांच्या हस्ते निधी वितरण झाले. यावेळी केंद्रीय कामगार,युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया,केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे आदी मान्यवर उपस्थित होते.देशभरातील सुमारे २०० ठिकाणी या कार्यक्रमाचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार सिमाताई हिरे,  म्हणाल्या की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी रोजगारनिर्मितीचे जे ध्येय निश्चित केले आहे,त्याच्या पूर्ततेसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. युवकांना रोजगार मिळाल्यास त्यांचे कुटुंब सक्षम होते,सक्षम कुटुंबांमधून सक्षम समाज घडतो आणि त्यातून राष्ट्र अधिक बळकट बनते.त्यामुळे प्रत्येक युवकाच्या हाताला काम देणे हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून,या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.युवक हे देशाच्या विकासाचा भक्कम पाया असून त्यांच्या कौशल्य, 
क्षमता आणि ऊर्जेच्या बळावर भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यास मदत होईल,असेही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) त्यांनी अभिनंदन केले. तसेच उपस्थित उद्योजक,कर्मचारी, लाभार्थी आणि मान्यवरांचे स्वागत करत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांनी घ्यावा,असे आवाहन आमदार सिमाताई हिरे, यांनी केले.

आयुक्त कोटकर,म्हणाले की,उद्योग आणि प्रशासन यांच्यातील समन्वय,विश्वास आणि सकारात्मक संवाद वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावी ठरत आहेत.केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही रोजगार निर्मिती, सामाजिक सुरक्षा आणि युवा सक्षमीकरणासाठी महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी रोजगारवाढीवर विशेष भर दिला आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे.नव्या रोजगार संधी निर्माण करण्यासोबतच कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेअंतर्गत प्रथमच रोजगार मिळविणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.तसेच नव्या कर्मचाऱ्यांची  नियुक्ती करणाऱ्या उद्योजकांनाही प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध होणार आहे. कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही लाभ देणारी ही योजना रोजगार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही केवळ कर्मचारी आणि नियोक्ता यांच्यासाठी आर्थिक लाभाची योजना नसून सामाजिक सुरक्षा,कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती यांचा प्रभावी संगम साधणारी योजना आहे. या योजनेमुळे उद्योग क्षेत्र आणि युवक यांच्यात विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले असून रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळाली आहे.या योजनेमुळे उद्योजकांचा नव्या पिढीवरील विश्वास वाढला असून नव उद्योजकांना संधी देण्याचे प्रमाण वाढले आहे.ज्ञान,ऊर्जा आणि काम करण्याची तयारी असलेल्या युवकांना उद्योग क्षेत्रात स्थान मिळू लागले आहे.याचा फायदा उद्योगांनाही होत असून उत्पादकतेत वाढ होत असल्याचे उद्योजक ॲड राठी,सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या