नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीदरम्यान नाशिक महानगरपालिका शहरात केवळ कुंभकेंद्रित कामे करत नसून पुढील अनेक दशकांचा विचार करून दीर्घकालीन आणि नागरिकहिताच्या पायाभूत सुविधा उभारत आहे.या विकासदृष्टीचा सर्वात ठोस नमुना म्हणजे अगरटाकळी येथे वेगाने आकार घेत असलेला ९७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.गोदावरी नदीतील वाढते प्रदूषण,शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.यामागील उद्दिष्ट केवळ सांडपाणी प्रक्रिया करणे नसून गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करणे आणि आगामी कुंभमेळ्यापूर्वी नदीचे पाणी स्नानयोग्य गुणवत्तेपर्यंत आणणे हे आहे.सध्या नाशिक शहरातील सांडपाणी व्यवस्थेची व्याप्तीच या प्रकल्पाची गरज अधोरेखित करते.
अगरटाकळी प्रकल्प शहरातील मोठ्या लोकवस्तीचा भार उचलणार आहे. पंचवटी, पोखार कॉलनी, आडगाव नाका, शिवाजीनगर, कॅनडा कॉर्नर,हिरावाडी,गंजमाळ, बाबा नगर,लोकशाहीर नगर, राजपाल कॉलनी,कुमावत नगर आणि दत्ता नगर या भागांतील सांडपाणी या केंद्रात प्रक्रिया केले जाणार आहे. याशिवाय अनेक नाले आणि थेट नदीकडे जाणारे असंसाधित सांडपाणी मार्ग यांना अडवून ते प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे.विद्यमान प्रकल्पाचे उन्नतीकरण करून त्याची क्षमता ७० दशलक्ष लिटर करण्यात येणार असून,९७ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे या प्रकल्पाची एकूण एकत्रित प्रक्रिया क्षमता १६७ दशलक्ष लिटर (९७ + ७०) इतकी होणार आहे.
नवीन विकास
क्षमता
विद्यमान प्रकल्पाचे उन्नतीकरण
७० दशलक्ष लिटर
नवीन प्रक्रिया केंद्र
९७ दशलक्ष लिटर
एकत्रित प्रक्रिया क्षमता
१६७ (९७ + ७०)दशलक्ष लिटर
पूर्णत्वाचे उद्दिष्ट
पुढील ६ महिने
या प्रकल्पाची आणखी एक विशेष बाब म्हणजे येथे पारंपरिक कंत्राट पद्धत वापरली जात नाही.पूर्वी कंत्राटदार प्रकल्प उभारून निघून जात असे. आता संपूर्ण व्यवस्था परिणामाधारित करण्यात आली आहे.प्रकल्प उभारणे पुरेसे नसून प्रत्यक्ष पाण्याची गुणवत्ता अपेक्षित स्तरावर पोहोचली तरच देयके दिली जाणार आहेत.त्यामुळे कंत्राटदार पुढील २५ वर्षे या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेसाठी जबाबदार राहणार आहे.यामुळे नागरी विकास प्रकल्पांमध्ये जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची नवी पद्धत विकसित होत आहे.
एका स्कॅनवर प्रकल्पाची संपूर्ण माहिती अगरटाकळी प्रकल्प प्रशासनातील पारदर्शकतेचेही नवे उदाहरण ठरत आहे. प्रकल्पस्थळी विशेष संकेत प्रणाली बसवण्यात आली असून कोणताही नागरिक आपल्या मोबाईलद्वारे संकेतचिन्ह स्कॅन करून प्रकल्पाची सध्याची प्रगती, एकूण क्षमता,कोणते भाग या यंत्रणेखाली येतात,कोणते नाले या प्रक्रियेत समाविष्ट आहेत,कामाचा वेग आणि दृश्य स्वरूपातील संपूर्ण माहिती थेट पाहू शकतो.
म्हणजे नागरिकांना प्रकल्पाविषयी माहिती मिळण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. माहिती थेट त्यांच्या हातात उपलब्ध होत आहे.शहरातील विकासकामांमध्ये अशी पारदर्शकता निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न मानला जात आहे.
या संपूर्ण प्रकल्पात अत्याधुनिक स्वयंचलित नियंत्रण प्रणाली वापरण्यात येत असून प्रत्येक टप्प्यावर प्रक्रिया सातत्याने तपासली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गोदावरीत मिसळणारे सांडपाणी नदीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवून ते प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे. म्हणजे प्रदूषण नदीत जाण्यापूर्वीच रोखले जाईल.नाशिक महानगरपालिका सातत्याने सांगत असलेले“कुंभापुरती नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी विकासकामे”हे धोरण या प्रकल्पातून स्पष्ट दिसते. हा प्रकल्प केवळ कुंभमेळ्यापुरता नसून पुढील २५ वर्षांसाठी नाशिकच्या पर्यावरणीय सुरक्षिततेचा मजबूत पाया ठरणार आहे.
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या,
अगरटाकळी प्रकल्प हा स्वच्छ गोदावरी, उच्च दर्जाची सांडपाणी प्रक्रिया,पारदर्शक प्रशासन आणि दीर्घकालीन शाश्वत विकास यांचा एकत्रित आदर्श ठरणार आहे. जानेवारी २०२७ पर्यंत गोदावरीतील पाणी स्नानयोग्य दर्जाचे होईल,या उद्दिष्टाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांच्या भविष्यासाठी टिकाऊ आणि परिणामकारक सुविधा निर्माण करणे हीच महानगरपालिकेची विकासदृष्टी आहे.
0 टिप्पण्या