मालेगावात कापडाचे तागे चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
(मालेगाव प्रतिनिधी)
मालेगाव: शहरातील रमजानपुरा भागात असलेल्या पवार टेक्स्टाईल्स या लुम कारखान्यातून कापडाचे तागे चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण ३ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १५ मे २०२६ रोजी रमजानपुरा पोलीस ठाणे हद्दीतील पवार टेक्स्टाईल्स कारखान्याचे शटरचे कुलूप कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. कारखान्यातून ५४ हजार रुपये किमतीचे २७ कापडाचे तागे चोरीला गेले होते. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटकेतील सं.आरोपीत:
१) अबुबकर निहाल अहमद (वय ३०, रा. रमजानपुरा, मालेगाव)
२) ज्ञानदेव सदा तांबे (वय २१, रा. नांदगाव, सध्या रा. मालेगाव)
मुद्देमाल जप्त:
पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले २७ कापडाचे तागे, शटर कापण्यासाठी वापरलेले कटर मशीन, बॅटरी आणि चोरीसाठी वापरलेली महिंद्रा सुप्रो मिनी गाडी (क्रमांक MH 41 AU 7916) असा एकूण ३,१०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना रमजानपुरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0 टिप्पण्या