लासलगाव :- लासलगाव-चांदवड रस्त्यावरील टाकळी विंचूर शिवारात एका भरधाव हुंडई आय-२० कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, अपघात घडवल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जनार्दन भरत गांगुर्डे (वय ३७, रा. दहिवद, ता. चांदवड) हे लासलगाव येथून बाजार करून आपल्या हिरो कंपनीच्या मोटारसायकलने (क्र. MH 15 HL 7557) चांदवडच्या दिशेने जात होते. सायंकाळच्या सुमारास टाकळी विंचूर शिवारातील गायकर पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या सफेद रंगाच्या हुंडई आय-२० कारने (क्र. MH 14 HD 5979) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात जनार्दन गांगुर्डे यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना खबर देण्याऐवजी कार चालक गाडीसह घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत.
0 टिप्पण्या