नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 2,792 रुग्णांना मदत23.51 कोटी रूपयांचा निधी वितरीत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यात २,७९२ रुग्णांना ₹२३.५१ कोटींची मदत देण्यात आली आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही योजना अशा रुग्णांसाठी कार्यरत आहे ज्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,माहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनांचा लाभ मिळू शकत नाही किंवा धर्मादाय रुग्णालयातून मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पात्र रुग्णांना वैद्यकीय समितीमार्फत पडताळणी करून आर्थिक सहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून,रुग्णालयातूनच ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी रुग्णाने तहसील कार्यालयाचा चालू वर्षाचा उत्पन्न दाखला(रूपये१.६० लाखांपेक्षा कमी),रेशनकार्ड, आधारकार्ड,आवश्यकतेनुसार नवजात बालकासाठी आईचे आधारकार्ड, अपघात प्रकरणात FIR/जनरल डायरी नोंद,रुग्ण संमतीपत्र तसेच अवयव प्रत्यारोपणासाठी शासकीय मान्यता सादर करणे आवश्यक आहे. मदत रुग्ण दाखल असतानाच दिली जाते, उपचारानंतर प्रतिपूर्ती दिली जात नाही. कॉक्लिअर इम्प्लांट, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, नवजात व बालकांचे आजार,हृदयरोग, मेंदूचे विकार,डायलेसिस,अपघात व जळीत रुग्ण अशा विविध गंभीर आजारांवर या निधीतून सहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी नाशिक जिल्हा कक्षातर्फे राबविण्यात आलेले विशेष उपक्रम‘मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर सप्ताह’ अंतर्गत मे 2025 मध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 43 ठिकाणी शिबिरे घेण्यात आली.या शिबिरांमधून 25 हजार 758 रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून 3 हजार 66 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली आहे.आषाढी वारी निमित्त त्र्यंबकेश्वर परिसरात “चरणसेवा” उपक्रम राबविण्यात आला. 658 स्वयंसेवकांच्या माध्यमातून 4 हजार 236 वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली,वारकऱ्यांना त्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सलग्न आयुर्वेद मेडिकल कॉलेज व फिजिओथेरपी कॉलेज यांच्या समन्वयातून वारकऱ्यांना हा चरणसेवा लाभ 

देण्यात आला. जुलै महिन्यात अपघातग्रस्त गरजू तरुणीस तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.तसेच दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबातील बालकाची सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चाची हृदय शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आली आहे.मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये अवयव दान प्रचार व प्रसार कार्य जिल्हा कक्षामार्फत राबविण्यात आले. 

ऑगस्ट महिन्यात सोग्रसफाटा येथील अपघातात जखमी झालेल्या ११ विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण रूपये 8.96 लाखांची मदत देण्यात आली,ज्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकले. “श्री गणेशा आरोग्याचा” या उपक्रमांतर्गत 1 हजार 98 ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन 45 हजार 872 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. सार्वजनिक सहभागातून आरोग्य जनजागृतीला चालना मिळाली. सप्टेंबर महिन्यात केवळ 690 ग्रॅम वजनाच्या नवजात शिशूस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी मदत मिळून नवजीवन प्राप्त झाले. तसेच नेत्र तपासणी अभियानांतर्गत 4 हजार 105 शिबिरांमधून 56 हजार 881 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती मध्ये पूरग्रस्त शेतकरी व नागरीक यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत कक्षाने केलेल्या आवाहनास जिल्ह्यातून एक हात मदतीचा ऑनलाईन पोर्टलद्वारे मदत पोहोचविण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून,गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरत असून लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाचे हे प्रभावी उदाहरण आहे.

माहिती स्त्रोत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी