नाशिक महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची भरारी IISER(आयसर) दरबारी

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील ४० विद्यार्थी व ०६ शिक्षक दि.२९ एप्रिल २०२६ रोजी आयसर सेंटर, पुणे (Indian Institute of Science Education and Research) येथे ज्ञानयात्रा करून आले.नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. नुकतेच महानगरपालिकेचे विद्यार्थी इस्रो सायन्स सेंटर, बेंगलोर येथे जाऊन विज्ञानविश्वाचा अनोखा अनुभव घेऊन आले. या प्रेरणादायी प्रवासाची पुढची पायरी म्हणून आता मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील तब्बल चाळीस विद्यार्थी व सहा शिक्षक दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी आयसर सेंटर, पुणे (Indian Institute of Science Education and Research) येथे ज्ञानयात्रा करून आले.
या भेटीदरम्यान विद्यार्थी ‘हँड्स-ऑन’ पद्धतीने विविध वैज्ञानिक प्रयोग स्वतः करून पाहिले. प्रयोगशाळेतील सजीव वातावरणात शास्त्रज्ञ व तज्ञांशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करण्याची अमूल्य संधी त्यांना लाभली. विज्ञान क्षेत्रातील आजवर लागलेले महत्त्वपूर्ण शोध, त्यांच्या मागील संकल्पना आणि त्यांचे वास्तव जीवनातील उपयोग यांचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी येथे प्रत्यक्ष अनुभवातून केला.
याशिवाय, पिंपरी-चिंचवड येथील विज्ञान केंद्राला भेट देऊन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तृत झाल्या. विज्ञानाच्या विश्वात नव्या शक्यता शोधण्याची प्रेरणा या दौऱ्यातून विद्यार्थ्यांना मिळाली.ही संपूर्ण अभ्यासदौरा सहल लोकसहभागातून साकारली जात आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. आनंदवली प्रभागाचे नगरसेवक तथा उपमहापौर विलास शिंदे यांनी ५०,००० रुपयांची तर प्रभागाच्या नगरसेविका उषाताई बेंडकोळी यांनी ११,००० रुपयांची उदार मदत देत या उपक्रमाला बळ दिले आहे.तसेच नाशिक महानगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांची,मुख्याध्यापक व शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधून येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी अशा संधी म्हणजे त्यांच्या स्वप्नांना पंख देणारे आकाशच ठरते. या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवण्याचा शिक्षकांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.

स्वप्नांना उंच भरारी देण्यासाठी संधीची साथ हवी आणि नाशिक महानगरपालिका ती संधी घडवत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी