स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा
नाशिक :- आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक व परिणामकारक पद्धतीने राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिले.जिल्हा परिषद,नाशिक येथील सभागृहात शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ.सुभाष बोरसे,शिक्षण उपसंचालक,नाशिक विभाग संजय राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET),नाशिकच्या प्राचार्या रंजना लोहकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सालमेटी, शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र बोडके तसेच नाशिक व मालेगाव मनपाचे प्रशासन अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,लेखाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा सर्वंकष आढावा घेतला.ते म्हणाले की,आगामी शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामपंचायत,नगरपालिका, लोकप्रतिनिधी व समाज यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी “निपुण महाराष्ट्र”अभियान प्रभावीपणे राबवावे. विद्यार्थ्यांच्या वाचन,लेखन व गणित कौशल्यांचे नियमित मूल्यमापन करून आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना कराव्यात.तसेच शिक्षणाधिकारी यांनी आठवड्यातून किमान एक दिवस शाळा भेटीसाठी राखून ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिक्षकांच्या सेवाविषयक प्रकरणांमध्ये प्रलंबितता राहू नये.यासाठी पदोन्नती,वेतन,भविष्य निर्वाह निधी (GPF) आदी विषय तातडीने निकाली काढावेत. नियमांनुसार पात्र प्रकरणांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळांतील मूलभूत सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी,स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे,स्वच्छ परिसर तसेच क्रीडा व इतर सुविधा उपलब्ध असणे अनिवार्य आहे. ज्या शाळांमध्ये दुरुस्ती,रंगरंगोटी किंवा इमारत सुरक्षिततेची आवश्यकता आहे, त्या कामांना प्राधान्याने पूर्ण करावे.धोकादायक इमारती तत्काळ निष्क्रिय करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.
प्रत्येक शाळेचा वस्तुनिष्ठ‘चार्ट’तयार करून त्यानुसार नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. CSR निधी,शासनाच्या विविध योजना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उभाराव्यात.“माझी शाळा – माझी जबाबदारी” या संकल्पनेतून समाजाचा सहभाग वाढवावा. शिक्षण अधिक आधुनिक करण्यासाठी प्रयोगशाळा,क्रीडांगण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) लॅब यांसारख्या सुविधा उभारण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळावे यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा,तसेच शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे.शाळा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय विशेष मोहीम राबवावी.आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “आनंददायी शनिवार” उपक्रमासोबतच स्वसंरक्षण प्रशिक्षण, सैनिकी प्रशिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवावेत.एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडावी,असेही नमूद करण्यात आले.
“गुणवत्ता, शिस्त, पारदर्शकता आणि समन्वय” या तत्त्वांवर आधारित शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.मान्यवरांच्या उपस्थितीत“धमाल सुट्टी”या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा