स्व.अजितदादा यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्राताई यांना खंबीर साथ द्या - मंत्री छगन भुजबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या देशभरात सक्षम महिला नेतृत्व म्हणून पुढे येतील - मंत्री छगन भुजबळ

बारामती :- देशात अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या,पंतप्रधान झाल्यात.त्याचप्रमाणे सुनेत्राताई पवार देशातील एक सक्षम महिला नेत्या म्हणून पुढे येतील. त्यामुळे त्यांना केवळ राज्याच्या नाही,तर देशाच्या नेत्या म्हणून निवडून देणार आहात. त्यांच्यात जनतेचे दुःख समजून घेण्याची संवेदनशीलता आहे.त्यांना बारामतीला देशाच्या नकाशावर एका नव्या उंचीवर न्यायचे आहे.त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करणे महत्त्वाचे असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा आज बारामती येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,मंत्री उदय सामंत,दिलिप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,मंत्री दत्तात्रेय भरणे,मंत्री बाबासाहेब पाटील,मंत्री मकरंद पाटील, इंद्रनील नाईक,खासदार सुप्रिया सुळे,खासदार रामराव वडकुते, हर्षवर्धन पाटील खासदार पार्थ पवार,जय पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व बारामती विधानसभा मतदारसंघातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व.अजितदादा पवार हे असे एक नेतृत्व,ज्यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला.त्यांचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यांसमोर विकास, धडाडी, निर्णयक्षमता आणि कामाची प्रचंड ताकद उभी राहते.त्यांच्या कार्यामुळे बारामतीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे,तर देशातही एक वेगळी ओळख निर्माण केली. आज मात्र मनाला एक चटका लावणारी भावना आहे.अशा नेतृत्वाची उणीव जाणवणं स्वाभाविक आहे.आपण मागे वळून पाहिलं, तर बारामतीने गेल्या काही दशकांत प्रगतीची अभूतपूर्व झेप घेतली आहे. शेती क्षेत्रात क्रांती झाली,पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवले गेले,उद्योगधंदे वाढले,शिक्षण संस्था उभ्या राहिल्या.रस्ते,वीज,पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मजबूत झाल्या.बारामती ही केवळ एक तालुका किंवा मतदारसंघ राहिला नाही. तो विकासाचा आदर्श बनला आहे.

ते म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांनी सुरू केलेला हा प्रवास अर्धवट सोडायचा का? हा वेग थांबवायचा का? की त्याला आणखी गती द्यायची? असा सवाल उपस्थित करत आपण थांबणार नाही. आपण मागे जाणार नाही. आपण पुढेच जाणार आहोत. यासाठी आज आपल्या समोर एक महत्त्वाचा पर्याय उभा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा त्या केवळ उमेदवार नाहीत,त्या एका परंपरेची पुढची पायरी आहेत.त्यांनी जवळून प्रशासन पाहिलं आहे, समाजकार्याचा अनुभव घेतला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात बारामतीबद्दल प्रामाणिक प्रेम आणि बांधिलकी आहे.त्यांनी प्रत्येक घटकाला समजून घेतलं आहे. शेतकरी,महिला,युवक,उद्योजक प्रत्येकाच्या अपेक्षा,प्रत्येकाची स्वप्नं त्यांना माहिती आहेत. स्व.अजितदादा पवार यांचे असलेले राज्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुनेत्राताई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की,आज महिलांच्या नेतृत्वाबद्दल आपण बोलतो,पण त्याला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.जर बारामतीने एका सक्षम महिलेला नेतृत्व दिलं,तर तो केवळ एक राजकीय निर्णय ठरणार नाही,तर तो समाजातील सकारात्मक बदलाचा संदेश ठरेल. सुनेत्राताई पवार या केवळ राज्यात नाही तर देशभरात सक्षम महिला नेतृत्व म्हणून पुढे येतील असा आपल्याला विश्वास आहे. ही निवडणूक केवळ राजकारण नाही. ही भावना आहे. ही जबाबदारी आहे. ही आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवड आहे. आज आपण जर ठामपणे निर्णय घेतला, तर आपण त्या महान कार्याला पुढे नेऊ शकतो. आपण स्व.अजितदादा यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली देऊ शकतो.बारामतीचा विकासाचा प्रवास थांबू देऊ नका.सुनेत्राताई यांच्या माध्यमातून तो अधिक वेगाने,अधिक ताकदीने पुढे न्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी