नाशिक :- महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “उन्नत नाशिक अभियान” (स्वच्छ नाशिक | सुंदर नाशिक | हरित नाशिक) या व्यापक व महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अनुषंगाने आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथील निसर्ग संवर्धन केंद्र येथे विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत नागरिकांची सामूहिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
“उन्नत नाशिक अभियान” हे दिनांक २२ एप्रिल २०२६ (वसुंधरा दिन) ते २२ एप्रिल २०३० या कालावधीत राबविण्यात येत असून, शहराचा सर्वांगीण, शाश्वत व नागरिक-केंद्रित विकास साधणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, बांधकाम स्थळ व्यवस्थापन, वृक्षारोपण व संगोपन, Garbage Vulnerable Points (GVP) निर्मूलन, १००% स्त्रोतावर कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त क्षेत्र निर्मिती, हरित क्षेत्र वाढ तसेच नागरिक सहभाग वृद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
तसेच, अभियानातील “भूप्रहरी” ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण असून, सामाजिक जाणीव व पर्यावरणप्रेम असलेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता, सौंदर्यीकरण व पर्यावरण संवर्धनाची कामे प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
सदर बैठकीत “उन्नत नाशिक अभियान” संदर्भात धोरण निर्मिती, स्वयंसेवी संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग कसा वाढवायचा याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात आली.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. आवेश पलोड,कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव,विजयश्री सेवा संस्थेचे मनोज साठे,नाशिकचे स्वच्छता दूत चंद्रकिशोर पाटील,तसेच राजेश पंडित,नंदकिशोर शिंदे,रणवीरसिंह जमादार,तेजस तलवारे,प्रणव बागुल,तेजस शिरसाट,विनय टेंभेकर,निलेश कटारीया,आकाश आव्हाड,राहुल हुलगे,रश्मी गवंडे,उल्का वाजे,देवयानी,आदित्य मगर,अशोक कुलकर्णी,सागर बैरागी,संजय साठे,सीमा बदाने,अर्चना कुरविनकोप आदींसह विविध सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीमध्ये कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित समाजसेवी यांच्यासोबत संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. बैठकीच्या माध्यमातून “उन्नत नाशिक अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
0 टिप्पण्या