जलसंधारण विभागाची कामे मुदतीत पुर्ण करावीत - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
नाशिक :- मृद व जलसंधारण विभागांतर्गत विविध योजनांची कामे प्रशासनामार्फत राबविली जातात. या योजना जलसाठा वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीही महत्त्वाच्या आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनेचे उद्दिष्ट मुदतीत साध्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.हि.झुरावत,वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, तंत्र अधिकारी विजय चौधरी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजीव शिंदे,सचिन खंबाईत,जिल्हा जल संधारण अधिकारी (जिल्हा परिषद) रघुनाथ गवळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोणे, सहाय्यक वनसंरक्षक (पश्चिम) प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक (पूर्व) शिवाजी सहाणे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की,‘जलयुक्त शिवार 2.0’ अंतर्गत गावनिहाय जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत असून पाणलोट क्षेत्र विकास,नाला खोलीकरण व रुंदीकरण,गाळ काढणे,बंधारे दुरुस्ती तसेच नवीन संरचना उभारणी यांसारखी कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. ज्या कामांना तांत्रिक मान्यता प्राप्त आहेत त्यांचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा. योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे,पूर्ण झालेली कामे,प्रलंबित कामे,तपासण्या तसेच सर्वेक्षण यांची माहिती अद्ययावत ठेवावी.
पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग प्राधान्याने करण्यात यावीत त्याशिवाय पुढील कामांचे प्रस्ताव व निधी वितरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.नाला खोलीकरण करताना कामांची मोजमापे,खोली,रुंदी तसेच गाळ काढण्याची प्रक्रिया तांत्रिक मानकांनुसार करण्यात यावी. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांची स्थिती अवनी ॲपवर वेळोवेळी अद्ययावत करून ती योग्य असल्याची खात्री ग्रामपंचायत व अशासकीय संस्था यांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसह जलयुक्त शिवार अभियान 2.0, मृद व जलसंधारण विभाग प्रत्यक्ष कामांची पडताळणी, जलशक्ती अभियान,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,पाणलोट विकास घटक 2.0, या योजनांचाही आढावा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी घेतला.जिल्हा जलसंधारण अधिकारी झुरावत यांनी जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम व योजनांची माहिती यावेळी सादर केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा