वणी :- म. वि. प्र. संचलित होरायझन अकॅडमी, वणी येथील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ‘माणुसकीची भिंत’ हा स्तुत्य उपक्रम राबविला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेले सुस्थितीतील कपडे,खेळणी तसेच इतर उपयोगी वस्तू गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मिळाव्यात, या उदात्त हेतूने जगदंबा मंदिर परिसरातील भिंतीवर व्यवस्थितपणे टांगून ठेवल्या. ज्यांना या वस्तूंची गरज आहे,अशा गरजू विद्यार्थ्यांनी त्या आनंदाने घेऊन जाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
आजच्या काळात अनेकदा वापरात नसलेल्या चांगल्या वस्तू घरात पडून राहतात किंवा निरुपयोगी समजून बाजूला ठेवल्या जातात. मात्र, त्याच वस्तू दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. याच विचारातून विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तूंचा त्याग न समजता त्यांचे योग्य व्यक्तीपर्यंत हस्तांतरण करण्याचा सुंदर प्रयत्न केला.दिवाळी हा आनंद,उत्साह, प्रकाश आणि एकमेकांमध्ये आनंद वाटण्याचा सण आहे.या सणाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि त्यांच्या दिवाळीत आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दानशूर वृत्ती, सहकार्य,सामाजिक जाणीव,परोपकार आणि माणुसकीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.‘आपल्याकडील अतिरिक्त वस्तू दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतात’हा विचार प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी समाजासमोर ठेवला.होरायझन अकॅडमीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, खऱ्या अर्थाने माणुसकीचा दिवा प्रज्वलित करणारा हा उपक्रम ठरला.
0 टिप्पण्या