नाशिक :- चांदवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चांदवड नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार राहुल आहेर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार या महत्त्वपूर्ण कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता आदेश निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान' या योजनेंतर्गत चांदवड नगरपरिषदेसाठी मंजूर निधीतून प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या कामासाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्याकडून ६ कोटी ९९ लाख १४ हजार ७१८ रुपये इतक्या रकमेची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे.
सदर प्रकल्पाच्या खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून उपलब्ध होणार असून,कामाची अंमलबजावणी चांदवड नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे नगरपरिषदेच्या विविध विभागांना एकाच छताखाली कामकाज करणे शक्य होणार असून,नागरिकांना नागरी सुविधा व प्रशासकीय सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मान्यतेतील अटी व शर्ती, ई-निविदा प्रक्रिया,गुणवत्ता नियंत्रण तसेच दोष दायित्व कालावधीसंदर्भातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.कामाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्रण, लेखापरीक्षण आणि निधीचा विनियोग नियमानुसार करण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.चांदवड शहराच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून,नागरिकांना अधिक सक्षम,सुसज्ज आणि आधुनिक प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध होण्यास या इमारतीमुळे हातभार लागणार आहे.
0 टिप्पण्या