मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नाशिक जिल्ह्यातून २ लाख ४१ हजारांची मदत


२२२ कृतिशील निवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी बंधू-भगिनींचा सहभाग;

नाशिक :- सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नाशिक जिल्ह्यातील कृतिशील निवृत्त कर्मचारी शासकीय अधिकारी, बंधू-भगिनींनी एकत्र येत २ लाख ४१ हजार रुपयांचा निधी संकलित केला आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने निधीचा धनादेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील एकूण २२२ कृतिशील निवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विशेष म्हणजे,काही सदस्यांनी दुसऱ्यांदा आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा निधी संकलित करण्यात आला.
कृतिशील संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शुक्ला यांनी सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून योगदानासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला नाशिक जिल्ह्यातील सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील कृतिशील संस्थेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी संकलनात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना कृतिशील संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शुक्ला,सुनील गायमुखे,एस.आर. जगताप,सी.डी.धनक, सुनंदा जरांडे,सरिता सोनवणे,रमेश शिसव तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व २२२ सदस्यांचे कृतिशील संस्थेच्या वतीने सचिव श्रीमती सुनंदा जरांडे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमांना सहकार्य मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी सामूहिक योगदानातून उभा राहिलेला हा उपक्रम सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या