अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ‘सर्वसमावेशक मधुमेह आणि डायबेटिक फूट क्लिनिक’चे उद्घाटन


मधुमेह नियंत्रण, डायबेटिक फूट आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींच्या व्यवस्थापनासाठी बहुविशेषज्ञ उपचारांची सुविधा

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक, ५ नोव्हेंबर २०२६ : मधुमेहाचे वाढते प्रमाण, कमी वयात होणारे निदान आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंती लक्षात घेऊन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबेटिस अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक’चे उद्घाटन करण्यात आले. मधुमेहाचे प्रभावी नियंत्रण, आधुनिक उपचार आणि विशेषतः डायबेटिक फूटसह मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींचे व्यवस्थापन यासाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा या क्लिनिकचा उद्देश आहे.

यावेळी डॉ. राकेश पाटील (फिजिशियन) यांनी भारतातील मधुमेहाचे वाढते प्रमाण, रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण, कमी वयात मधुमेहाचे निदान आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. परेश अलवाणी (फिजिशियन) यांनी जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मधुमेह उपचारांतील आधुनिक प्रगतीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. राजश्री धोंगडे (फिजिशियन) यांनी मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याच्याशी संबंधित सहव्याधींच्या व्यवस्थापनावर प्रकाश टाकला.

डॉ. प्रियंका भट (नेत्ररोगतज्ज्ञ) यांनी मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्यावर होणाऱ्या परिणामांविषयी, विशेषतः डायबेटिक रेटिनोपॅथीबाबत माहिती दिली. डॉ. अमोल भालेकर (इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट) यांनी मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या परिणामांविषयी म्हणजेच डायबेटिक व्हॅस्क्युलोपॅथीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. प्रणित मानकरे (प्लास्टिक आणि हँड सर्जन) यांनी डायबेटिक फूट, पायांवरील जखमा आणि त्यांच्या योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. मधुमेही रुग्णांनी पायांची नियमित काळजी घेणे आणि जखमांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त हॉस्पिटलतर्फे ‘सर्वसमावेशक मधुमेह आरोग्य तपासणी पॅकेज’ अवघ्या ₹५०० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये रँडम ब्लड शुगर (RBS), HbA1c, सीरम क्रिएटिनिन तपासणी, नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला, फिजिशियन सल्ला आणि डायबेटिक फूटसाठी प्लास्टिक सर्जन ओपीडी सल्ला यांचा समावेश आहे. या माध्यमातून मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेचे नियंत्रण, मूत्रपिंडाच्या कार्याचे मूल्यमापन, डोळ्यांची तपासणी आणि पायांवरील जखमांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.

श्री. अनुप त्रिपाठी, सेंटर हेड, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी सांगितले की, “मधुमेहाचे व्यवस्थापन हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यापुरते मर्यादित नसून, रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः डायबेटिक फूट आणि इतर गुंतागुंतींचे वेळेवर निदान व उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळण्यास मदत होऊ शकते. या क्लिनिकच्या माध्यमातून विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून आधुनिक उपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ₹५०० मधील विशेष तपासणी पॅकेजमुळे नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला परवडणाऱ्या दरात मिळू शकेल.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या