अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा नवा उपक्रम; प्लास्टिक आणि ट्रॉमा सर्जरीविषयी विशेष पुस्तिकेचे प्रकाशन!



पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, हाताच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट आणि रक्तवाहिन्यांवरील उपचारांची माहिती एकाच पुस्तिकेत

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक,२३ ऑक्टोबर २०२६ : प्लास्टिक सर्जरी ही केवळ सौंदर्यवर्धनापुरती मर्यादित नसून अपघात, भाजलेल्या जखमा,जन्मजात विकृती, हाताच्या गंभीर दुखापती आणि शरीराच्या विविध भागांची रचना व कार्यक्षमता पुन्हा सुधारण्यासाठी महत्त्वाची वैद्यकीय शाखा आहे. या उपचारांविषयी रुग्णांना आणि सर्वसामान्यांना उपयुक्त माहिती मिळावी, या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे प्लास्टिक, कॉस्मेटिक, हँड आणि ट्रॉमा सर्जरीविषयक विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तिकेत भाजलेल्या जखमा व त्यानंतर निर्माण होणारे त्वचेचे आकुंचन, हात व बोटांच्या दुखापती, नस आणि रक्तवाहिन्यांच्या दुखापती, बोटे किंवा हात पुन्हा जोडण्याच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया, जन्मजात विकृती, चेहऱ्यावरील जखमा, त्वचेच्या व मऊ ऊतींच्या गाठी, डायबेटिक फूट आणि दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांवरील उपचारांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय राइनोप्लास्टी, गायनेकोमॅस्टिया सर्जरी, लिपोसक्शन, व्रणांवरील उपचार आणि इतर कॉस्मेटिक व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व कन्सल्टंट प्लास्टिक, कॉस्मेटिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. प्रणित डी. मानकरे यांनी केले. जनरल सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीमधील उच्च शिक्षणासह त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी तसेच हाताच्या आणि पुनर्रचनात्मक सूक्ष्म शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

डॉ. प्रणित डी. मानकरे यांनी सांगितले की, “प्लास्टिक सर्जरीविषयी अनेकदा केवळ सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने विचार केला जातो. मात्र, अपघात, भाजलेल्या जखमा, जन्मजात विकृती आणि हाताच्या गंभीर दुखापतींनंतर शरीराची रचना व कार्यक्षमता सुधारण्यात या शाखेची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या पुस्तिकेद्वारे रुग्णांना उपलब्ध उपचार, आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रे आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल.”

पुस्तिकेत मधुमेहामुळे पायांवर होणाऱ्या जखमा आणि रक्तपुरवठ्याशी संबंधित समस्यांवरही विशेष भर देण्यात आला आहे. अशा रुग्णांमध्ये जखम भरून येण्यासाठी रक्तपुरवठा सुधारणे आणि आवश्यकतेनुसार अवयव वाचवण्यासाठी उपचार करणे महत्त्वाचे असते. या उपचारांमध्ये प्लास्टिक सर्जरी आणि इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी यांच्यातील समन्वयाची भूमिका पुस्तिकेत अधोरेखित करण्यात आली आहे.

इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अमोल भालेकर यांनी सांगितले की,“डायबेटिक फूट आणि दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांमध्ये रक्तपुरवठ्याची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. आवश्यकतेनुसार रक्तवाहिन्यांवरील उपचारांद्वारे रक्तप्रवाह सुधारण्यास, जखमा भरून येण्यास आणि काही रुग्णांमध्ये अवयव कापण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून रुग्णांना सर्वसमावेशक उपचार देणे हा या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे.”अनुप त्रिपाठी,सेंटर हेड,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी सांगितले की,“रुग्णांना योग्य माहिती, तज्ज्ञ उपचार आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्लास्टिक, हँड आणि ट्रॉमा सर्जरीविषयक ही पुस्तिका रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल. आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयातून रुग्णांचे आरोग्य, कार्यक्षमता आणि जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या