केटीएचएमतर्फे ‘नवदुर्गा’ विशेष मासिकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण



समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला मिळणार व्यासपीठ

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, मात्र प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या महिलांच्या कार्याची ओळख समाजाला करून देण्याच्या उद्देशाने केटीएचएम महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘नवदुर्गा’ या विशेष मासिकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण आज (दि.१९) रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मविप्रचे संचालक ॲड. रमेशचंद्र बच्छाव, शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख, प्रा. डी. डी. जाधव, डॉ. कैलास शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. शशिकांत मोगल, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, विभागप्रमुख डॉ. विक्रम काकुळते, डॉ. किरण रेडगांवकर, डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले, डॉ. वैशाली टिळे, अंजली कामाले, सोनाली देवरे, सविता तिदमे, वृषाली शिंदे, शैला मेंगाणे, विशाखा समितीच्या सदस्या तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक शहरातील आणि परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामाजिक योगदानातून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या;परंतु ज्यांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही, अशा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय‘नवदुर्गा’ या विशेष मासिकाच्या माध्यमातून करून दिला जाणार आहे. या महिलांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित लेखांचा समावेश या मासिकात करण्यात येणार असून, येत्या २८ ऑक्टोबर रोजी हे विशेष मासिक प्रकाशित होणार आहे. समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाला व्यापक ओळख मिळवून देणे आणि त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमातून नाशिकमधील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांच्या प्रेरणादायी कार्याची व्यापक स्तरावर दखल घेतली जाणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या