दशक्रियाविधीप्रसंगी‘अवयवदान महादान’चा जागर,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांचा देहदानाचा संकल्प

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
निफाड :- गुणवंत कामगार कै. कमलाकर कहाणे यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने निफाड येथे अवयवदान चळवळीतील कार्यकर्ते डॉ.संजय रकिबे यांच्या ‘अवयवदान–महादान’ या विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अवयवदान व देहदानाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे आणि या चळवळीविषयी व्यापक जनजागृती व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात डॉ.संजय रकिबे आणि प्रा.अशोक सोनवणे यांनी उपस्थितांना अवयवदानासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. अवयवदानाचे महत्त्व, त्यातून अनेकांना मिळू शकणारे नवजीवन आणि देहदानाचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी निफाडचे नगराध्यक्ष अनिल कुंदे,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्या हस्ते उपस्थितांना अवयवदान कार्ड तसेच देहदानाचे फॉर्म वितरित करण्यात आले.दुःखद प्रसंगाचे रूपांतर समाजोपयोगी उपक्रमात करून अवयवदान व देहदानाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमातून प्रयत्न करण्यात आला.अवयवदान आणि देहदानाविषयी सामाजिक जाणीव वाढविण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची प्रेरणा या उपक्रमाने दिली.देहदान चळवळ गतिमान करण्याचे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी अवयवदान व देहदान चळवळीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देऊन ती गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.खासदार भास्कर भगरे यांनीही अवयवदान चळवळीचा जनमानसात अधिकाधिक प्रसार होण्याची आणि त्यातून व्यापक जनजागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.वाढदिवशीच देहदानाचा संकल्प या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीचा विशेष आयाम लाभला. निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांचा वाढदिवस असतानाही कै. कमलाकर कहाणे यांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगी त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केला.हा फॉर्म त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.यावेळी शामराव दिवटे आणि बबनराव सानप यांनीही देहदानाचे फॉर्म भरून दिले.

शंभर व्यक्तींचे देहदानाचे अर्ज भरून देण्याचा संकल्प समाजात देहदानाविषयी जागरूकता निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे,या उद्देशाने किमान शंभर व्यक्तींचे देहदानाचे फॉर्म भरून वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्याचा निर्धार राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या