नाशिक,दि२३जुलै :- कुंभमेळा मंत्री तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत सुरू असलेल्या 'मिशन ग्रीन मान्सून'उपक्रमाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या अभियानाच्या पाचव्या टप्प्यात आता क्यूआर कोडद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांनी मागणी केलेल्या देशी प्रजातींच्या रोपांचे प्रभागनिहाय वाटप करण्यात येणार आहे.नाशिक शहर अधिक हरित,सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने नागरिकांना त्यांच्या परिसरात वृक्षारोपण करता यावे यासाठी विशेष क्यूआर कोड नोंदणी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली होती.या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत आज अखेर ८,७५० देशी वृक्षांच्या रोपांची मागणी नोंदविली आहे.या सर्व नोंदणीकृत नागरिकांना येत्या पाचव्या टप्प्यात त्यांच्या प्रभागातून रोपांचे वितरण करण्यात येणार आहे.प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून संबंधित नगरसेवक,कार्यकर्ते,भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.वृक्षलागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनावरही विशेष भर देण्यात येणार आहे.'मिशन ग्रीन मान्सून'अभियानाच्या पहिल्या चार टप्प्यांत २५ हजारांहून अधिक देशी वृक्षांच्या लागवडीला प्रारंभ झाला आहे.या अभियानाचा शुभारंभ पहिल्या टप्प्यात सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत ५ हजार वृक्षांच्या लागवडीने करण्यात आला.दुसऱ्या टप्प्यात म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) आणि त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.तिसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दोन्ही तीरांवर ६ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून नदीला हरित संरक्षण कवच देण्यास सुरुवात झाली.तर चौथ्या टप्प्यात दऱ्याई माता परिसर,दरी येथे ५ हजार आणि पुणे विद्यापीठ उपकेंद्र, नाशिक येथे २ हजार वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ करण्यात आला.या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रविवारी मंत्री गिरीश महाजन स्वतःविविध ठिकाणी उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेत आहेत.ते वृक्षप्रेमी नागरिक,स्वयंसेवी संस्था,युवक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असून,वृक्षलागवड ही केवळ शासकीय मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.याबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले,"हरित नाशिक हा केवळ शासनाचा संकल्प नाही,तर प्रत्येक नाशिककराचा संकल्प आहे. नागरिकांनी स्वतःपुढाकार घेत क्यूआर कोडद्वारे मोठ्या प्रमाणावर रोपांची मागणी केली आहे,ही अत्यंत आनंदाची बाब आहे.वृक्ष लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे.आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला देशातील सर्वात हरित,स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा आपला निर्धार आहे.'मिशन ग्रीन मान्सून'च्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभी राहत असून,नाशिक शहराला देशातील सर्वाधिक वृक्षसंपन्न आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हे अभियान वेगाने पुढे जात आहे.
0 टिप्पण्या