नाशिक महापालिकेच्या वतीने श्री संत गुलाबराव महाराज यांची जयंती


नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे श्री संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सचिन जाधव,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,वाल्मीक ठाकरे,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,सोमनाथ कासार,विजय दौडे,दर्शन बागुल,वैशाली घावटे,संजय मोरे, आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री संत श्री गुलाबराव महाराज
(दि.०६ जुलै, १८८१ - २० सप्टेंबर, १९१५)

संत शिरोमणी प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांचा जन्म ६ जुलै १८८१ रोजी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथे गोंदुजी व अलोकाबाई मोहोड यांच्या पोटी झाला.त्यांचे मूळ नाव गुलाब गोंदुजी मोहोड असे होते. वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत त्यांना अंधत्व आले,परंतु असामान्य बुद्धिमत्ता,आध्यात्मिक चिंतन व विलक्षण स्मरणशक्तीच्या बळावर त्यांनी ज्ञानाचे अद्वितीय शिखर गाठले.त्यांचे बालपण माधान येथे व्यतीत झाले असून हे गाव त्यांच्या कार्यामुळे पावन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
अल्पायुषी असूनही त्यांनी अध्यात्म, तत्त्वज्ञान,भक्ती,वेदान्त व साहित्य या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी सुमारे १३४ ग्रंथ, २०९९ अभंग, २२५२ पदे, १२५० गीते, १००० श्लोक व २३,००० ओव्या अशी अमूल्य साहित्यसंपदा निर्माण केली.त्यांचे लेखन संस्कृत,मराठी, हिंदी,ब्रजभाषा व वन्हाडी भाषेत उपलब्ध आहे.ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणारे आणि माधुर्यभक्तीचे महान उपासक म्हणून त्यांना विशेष मान्यता मिळाली.भारत सरकारने सन २०१९ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले. २० सप्टेंबर १९१५ रोजी पुणे येथे त्यांचे महानिर्वाण झाले.त्यांचे जीवनकार्य आजही समाजाला ज्ञान,भक्ती व अध्यात्माची प्रेरणा देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या