मान्यवरांच्या उपस्थितीत संगीत सोहळ्याचे आयोजन
नाशिक :- मराठी, हिंदी भावगीत रसिकांच्या ह्रदयसिंहासनावर अधिराज्य गाजवलेल्या गानसम्राज्ञी स्वर्गवासी सुमन कल्याणपूर यांना नाशिककर रसिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या सोमवारी (दि.२९) 'भावसुमनांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपुर यांच्या मासिक स्मृतिदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक महापालिका व क्षितिज प्रस्तुत 'रात्र आहे पौर्णिमेची' हा संगीत कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कला मंदिर, शालिमार चौक येथे होणार आहे. या संगीत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय सुमनताई कल्याणपुर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
त्यानंतर गायिका विद्या कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी,अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी हे सुमनताई यांची हिंदी व मराठी गीते सादर करणार आहेत, त्यांना अनिल धुमाळ (सिंथेसायझर), प्रणव हरिदास (बासरी), शुभांगी भावसार (हार्मोनियम), महेश कुलकर्णी (गिटार), आदित्य कुलकर्णी (तबला), अभिजीत शर्मा (ॲक्टोपॅड), महेंद्र फुलपगार (तालवाद्य) हे साथसंगत करणार असून निवेदनाची जबाबदारी अमेय रानडे हे सांभाळणार आहेत.
नाशिककरांच्यावतीने होणाऱ्या या संगीत सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर हिमगौरी आडके, नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,मनपा गटनेते ॲड. शाम बडोदे, अजय बोरस्ते,सीमा ठाकरे,केशव पोरजे, या कार्यक्रमाचे निर्माता सुधीर कुलकर्णी आदींनी केले आहे.
३५ वर्षानंतरचा भारतातील पहिला कार्यक्रम नाशकात
ज्येष्ठ गायिका सुमनताई कल्याणपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा गायनाचा भव्य कार्यक्रम विद्या कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१० मध्ये १६ वर्षांपूर्वी नाशिक येथे दादासाहेब गायकवाड सभागृहात सादर केला होता. सुमनताई कल्याणपुर यांचा हा सार्वजनिक कार्यक्रम भारतात ३५ वर्षानंतर नाशिकनगरीत प्रथमच झाला होता.सुमनताई यांची कन्या चारूल यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंगला खाडीलकर,यांच्या खुमासदार निवेदनाद्वारे सुमनताई यांना बोलते करीत त्यांचा जीवनपट रसिकांसमोर'जुळल्या सुरेल तारा' या कार्यक्रमाद्वारे उलगडला होता. 'त्या' सुवर्ण क्षणाची आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा करून दिली जात आहे.
0 टिप्पण्या