नाशिक दि.5 :- महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक येथे वर्षभराचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मंगळवार 9 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी,नाशिक चे उपसंचालक (प्रशासन) नंदकुमार ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चे प्रशिक्षण 9 जून 2025 पासून सुरू झाले होते. या तुकडीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह व गोवा राज्यातून (1 प्रशिक्षणार्थी) निवड झालेल्या एकूण 583 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा सहभाग असून सर्वांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
प्रशिक्षणार्थींपैकी सुमारे 84.39 टक्के प्रशिक्षणार्थी पदवीधर असून 15.61 टक्के प्रशिक्षणार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत.वर्षभर चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,भारतीय साक्ष अधिनियम,स्थानिक व विशेष कायदे,फॉरेन्सिक सायन्स, सायबर गुन्हे,गुन्हेगारी शास्त्र तसेच बाह्य वर्गात कवायत,शारीरिक प्रशिक्षण,गोळीबार सराव आणि योग आदी विषयांचेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर होणाऱ्या दीक्षांत संचलन समारंभास महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.ते प्रशिक्षणार्थींकडून मानवंदना स्वीकारतील.तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज, हे सर्व प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.सदर दीक्षांत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हद्वारे करण्यात येणार असून नागरिकांना हा सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे,असेही उपसंचालक (प्रशासन) ठाकूर यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या